Mass Suicide एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केली आहे. एकाच घरात पाच मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा या ठिकाणी ही घटना घडली आहे. मृतदेहांच्या शेजारी दुधाचे ग्लास आढळले आहेत. दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आत्महत्येचं प्रकरण आहे. पोलिसांना भिंतीवर सुसाईड नोट आणि एक व्हिडीओही मिळाला आहे.

पोलिसांनी सदर घटनेबाबत काय सांगितलं?

या घटनेबाबत मथुराचे पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांनी माहिती दिली. श्लोक कुमार म्हणाले की मथुरा येथील खपरपूर गावात एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आयुष्य संपवलं आहे. पाच जणांचे मृतदेह आम्हाला मिळाले आहेत. मुकेश असं या कुटुंबातल्या प्रमुखाचं नाव आहे. तो शेती करायचा. मुकेशचा भाऊ त्याच्या शेजारच्या घरातच राहतो. आज सकाळी घरातून कुणाचाच आवाज आला नाही. त्यामुळे तो घरात काय झालं आहे बघायला आला त्यावेळी त्याला मुकेश आणि इतर चार जणांचे मृतदेह दिसले.

भिंतीवर सुसाईड नोट आढळली, व्हिडीओही मिळाला

श्लोक कुमार पुढे म्हणाले आम्हाला भिंतीवर एक सुसाईड नोट आढळून आळी आहे. सुसाईडच्या संदर्भातला एक व्हिडीओही आम्हाला मिळआला आहे. आता या प्रकरणी मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान पुढील तपास सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तसंच ज्या ज्या गोष्टी घटनास्थळावर पुरावा म्हणून काम करु शकतात त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

घटनास्थळी आढळून आले दुधाचे ग्लास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ज्या ठिकाणी मृतदेह आढळले त्या घरात दुधाचे ग्लासही सापडले आहेत. मुकेश, त्याची पत्नी आणि त्यांची तीन मुलं अशा पाच जणांनी आयुष्य संपवलं आहे. शेजारच्या लोकांनीही घरात पाहिलं तेव्हा काहीतरी चुकीचं घडलं आहे हे त्यांना जाणवलं ज्यानंतर पोलिसांना या ठिकाणी बोलवण्यात आलं असंही स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान पोलिसांना जे ग्लास आढळले ते फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या ठिकाणी जे पुरावे गोळा करायचे होते तेदेखील गोळा करण्यात आले आहेत. पाचही मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल येत नाही तोपर्यंत हे मृत्यू नेमके कशामुळे झाले ते सांगता येणार नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. प्राथमिक तपासावरुन या सगळ्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी असं वाटतं आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.