Five Members Of a Family Found Dead Inside Home : मेरठच्या लिसारी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. पीडितांमध्ये एक पुरुष, त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश आहे. ही तीनही मुलं १० वर्षांखालील आहेत. या जोडप्याचे मृतदेह जमिनीवर सापडले तर मुलांचे मृतदेह बेडच्या आतमध्ये आढळून आले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व मृतदेहांच्या डोक्याला जखमा होत्या आणि जड वस्तूने मारल्याच्या खुणा आहेत.”मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. प्राथमिक निरीक्षणानुसार, वैयक्तिक वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे दिसते. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून, तपास वेगाने सुरू आहे”, असे एसएसपी विपिन टाडा यांनी सांगितले.
बाहेर कुलूप तर आतमध्ये मृतदेह
शेजाऱ्यांना काहीतरी असामान्य दिसल्यावर पोलिसांना सतर्क करण्यात आले आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या तक्रारीनुसार पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घराला बाहेरून कुलूप लागलेले दिसले. त्यामुळे पोलिसांनी छतावरून आत प्रवेश केला. परंतु, आतमध्ये शिरताच पोलिसांना भीषण चित्र दिसलं. पाच जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जड वस्तूमुळे हे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
हेही वाचा >> “अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
घर अस्ताव्यस्त, तर सर्वत्र मृतदेह
घटनास्थळावरील व्हिज्युअल्समध्ये घर पूर्णपणे अस्ताव्यस्त आणि आजूबाजूला पडलेले मृतदेह दिसत आहेत. सर्वात लहान मुलाचा मृतदेह एका गोणीत बेडबॉक्समध्ये आढळून आला. याबाबत शेजाऱ्यांनी सांगितले की बुधवारी संध्याकाळपासून हे कुटुंब दिसले नाही, ज्यामुळे चिंता वाढली आणि अखेरीस शोध लागला.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना एसएसपी टाडा म्हणाले की, घराला बाहेरून कुलूप होते. पोलिसांनी छतावरून आत प्रवेश केला असता त्यांना मृतदेह आढळून आला. फॉरेन्सिक टीम घराची तपासणी करत आहेत. तसंच हत्या कशी झाली, कोणी केली याची कसून चौकशी सुरू आहे.