पीटीआय, नवी दिल्ली दिल्लीमधील जुन्या राजेंद्रनगर भागामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्युप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी पाच जणांना अटक केली. तर दिल्ली महापालिकाही सक्रिय झाली असून राजेंद्रनगर, मुखर्जीनगर आणि अन्य ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. दिल्ली पोलीस महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नाल्यांचा गाळ काढणे आणि ‘राव आयएएस स्टडी सर्कल’ला मंजुरी प्रमाणपत्र देणे या प्रश्नांवरून त्यांची चौकशी होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांत एका एसयूव्ही चालकाचा समावेश आहे. मनोज कथुरिया असे या चालकाचे नाव आहे. तळघराचे सहमालक असलेल्या तेजिंदर सिंग, परविंदर सिंग, हरविंदर सिंग आणि सरबजीत सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्वांना सोमवारी न्यायदंडाधिकारी विनोद कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना १२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींच्या जामीन याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. चालकाने शनिवारी संध्याकाळी पावसाचे पाणी साचलेल्या रस्त्यांमधून एसयूव्ही चालवली. त्यामुळे ‘राव आयएएस स्टडी सर्कल’ या प्रशिक्षण केंद्राच्या तीन मजली इमारतीजवळ पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. हे पाणी इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरले आणि झपाट्याने तळघरात साचले. यात तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह सोमवारी त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. हेही वाचा >>>विधानसभा निवडणुकीत भाजपचा ‘सावरकर’ मुद्दा ! दरम्यान, दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह विभागाने चौकशी समिती गठित केली आहे अशी माहिती विभागाच्या प्रवक्त्यांनी सोमवारी दिली. सरन्यायाधीशांना पत्र यूपीएससी परीक्षा देणाऱ्या अविनाश दुबे या विद्यार्थ्याने सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच साचणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्याना निर्देश देण्याचीही विनंती केली आहे. हेही वाचा >>>अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका संसदेतही प्रश्न उपस्थित संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. लोकसभेत भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी दिल्लीतील ‘आप’ सरकार या घटनेसाठी कारणीभूत असल्याचा आरोप केला. ही घटना दुर्दैवी असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले. याप्रकरणी सखोल तपास करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवरील अतिक्रमणे काढून टाकली जात आहेत. सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या बेकायदा तळघरांविरोधात कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्याला बडतर्फ करण्यात आले असून एका साहाय्यक अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.-अश्वनी कुमार, आयुक्त, दिल्ली महापालिका