Kerala Amusement Park Giant Wheel Accident: केरळच्या तिरुवनंतपुरम मधील वेंबयम येथील एका ॲम्युझमेंट पार्कमध्ये जायंट व्हिल राइड कोसळून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. ज्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त तिरुवनंतपुरम येथील हॅप्पीलँड मनोरंजन पार्कमध्ये दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोठी गर्दी झाली होती. यावेळी मोठी व्हिल राईड सुरू असताना वेल्डिंग सांधे आणि त्याला आधार देणारे लोखंडाचे स्ट्रक्चर कोसळल्यामुळे जायंट व्हिल जमिनीवर आदळले.

पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यात मनोरथी (५४), सीमनी (४९), मालिनी (४९), श्याम डॅनिअल (१४) आणि रोज (१६) यांचा समावेश आहे. हे सर्व जण तमिळनाडूच्या नागरकोविलचे रहिवासी होते. दरम्यान या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून जायंट व्हिल कोसळताना पर्यटकांच्या किंचाळण्याचा आवाज येत आहे.

व्हिलचा लोखंडी आधार असलेली चौटक अचानक तुटल्याने त्यावर रचलेले जायंट व्हिल खाली पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना सध्या सुट्टी आहे. तसेच सार्वजनिक सुट्टी आल्यामुळे या पार्कमध्ये मुलांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

केरळ पोलीस दल आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

जखमींपैकी एका महिलेला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला पुढील उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. इतर जखमींची स्थिती आता स्थिर असल्याचे सांगितले जाते. काहींना फ्रॅक्चर आणि इतर किरकोळ दुखापत झाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या मनोरंजन पार्कमधील राईड्सची नियमित तपासणी, तसेच सुरक्षेचे उपाय योजले होते की नाही, याची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, जर निष्काळजीपणा किंवा सुरक्षेच्या नियमांची मोडतोड झाल्याचे समोर आले तर पार्कच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल.