अमेरिकेतील संशोधक माईक ह्युजेस यांचा एका दूर्घटनेमध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी मृत्यू झाला. एका प्रयोगादरम्यान माईक यांनी स्वत: तयार केलेल्या वाफेच्या रॉकेटला बांधले आणि हवेत लॉन्च केले. मात्र या प्रयोग फसला आणि उंचावरुन पडून माईक यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफॉर्नियातील बारस्टोव्ह येथील वाळवंटामध्ये माईक हे स्वत: तयार केलेल्या वाफेवर चालणाऱ्या रॉकेटचे काही प्रयोग करत होते. घरच्याघरी रॉकेट बनवणाऱ्या प्रयोगशील संशोधकांसाठी चालवण्यात येणाऱ्या ‘होममेड अॅस्ट्रोनॉट्स’ या सिरिजसाठी ‘सायन्स चॅनेल’ या वहिनीमार्फत हा प्रयोग रेकॉर्ड चित्रित केला जात होता.

माईक हा फ्लॅट अर्थ थेअरी म्हणजेच पृथ्वी गोलाकार नसून सपाट आहे या सिद्धांताचे समर्थक होते. आकाशात झेप घेऊन पृथ्वी ही थाळीच्या आकारासारखी नसून सपाट आहे हे सिद्ध करण्यासाठी माईक वेगवेगळे प्रयोग करत होते. त्यांनी २०१४ साली पहिल्यांदा स्वत: बनवलेल्या रॉकेटमधून उड्डाण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस त्यांनी एक हजार ३७४ फूटांपर्यंत उड्डाण केलं होतं. मात्र त्यांनंतर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांना फारसे यश मिळालं नव्हतं. २०१८ साली त्यांनी केलेल्या अशाच एका प्रयत्नामध्ये मात्र त्यांनी एक हजार ८७५ फूट उड्डाण केलं होतं.

माईक यांचा प्रयोग का फसला याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र माईक यांनी हे रॉकेट तयार करण्यासाठी १८ हजार डॉलर (१२ लाख ६० हजार रुपयांहून अधिक) खर्च केला होता. माईक हे मागील अनेक वर्षांपासून पृथ्वी सपाट आहे हे सिद्ध करण्याच्या प्रयोगांसाठी लोकांकडून निधी गोळा करत होते. माईक अनेकदा जीव धोक्यात टाकून प्रयोग करायचे. प्रयोग करताना ते सुरक्षेची फारशी काळजी घ्यायचे नाहीत. अनेकदा त्यांना यामुळे दुखापतही झाली होती. २२ फेब्रुवारी रोजी माईक यांनी केलेल्या प्रयोगादरम्यान झालेल्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.