मुसळधार पावसाने जम्मू-काश्मीरमध्ये घातलेल्या थैमानात आतापर्यंत २० जण मृत्युमुखी पडले आहेत. तर राजौरी जिल्ह्य़ात एक बस वाहून गेल्याने ४५ जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे राज्यात आतापर्यंत २० जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे, असे अर्थमंत्री अब्दुल रहिम राथेर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी उपमुख्यमंत्री ताराचंद हे उपस्थित होते.
आकडेवारीनुसार काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, बारामुल्ला आणि बडगाम या जिल्ह्य़ात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. तर जम्मू भागातील रेसाई येथे सहा आणि दोडा येथे एक तर पूंछ जिल्ह्य़ात सातजणांचा मृत्यू झाल्याची माहिती राथेर यांनी दिली.
जम्मूतील राजौरी जिल्ह्य़ात सुमारे ५० जणांना घेऊन जाणारी एक बस गंभीर नदीत वाहून गेल्याची माहिती आहे. यातील तीन जणांची सुटका करण्यात आली असून या दुर्घटनेत ४५ जण मरण पावल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांचा शोध घेण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
राज्यात झालेल्या प्रलंयकारी पावसात १५० घरांचे नुकसान झाले आहे. अनंतनाग जिल्ह्य़ात ५० घरे पाण्याखाली गेली आहेत. कुलगाम जिल्ह्य़ातील १५ गावांना पुराचा तडाखा बसला आहे, तर कुलगाममधीलच अस्थाल गावात १५०० लोक पुराच्या पाण्यात अडकल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या मुसळधार पावसामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला असून काही ठिकाणी पर्यटक खोळंबले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणखीही काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.