पीटीआय, गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. बहुतेक नद्यांचे पाणी ओसरू लागले आहे. परंतु तरीही २१ लाख नागरिक अद्याप पुरात अडकले आहेत. कच्छरमधील सिलचर शहरातील काही भाग आठवडय़ापेक्षाही जास्त काळ पाण्याखाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सोमवारी आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या

१३४ वर पोहोचली आहे. एक जण बेपत्ता आहे.

कोपिली आणि बराक वगळता बहुतांश नद्यांची पाणीपातळी घटत आहे. नागाव आणि बराक खोऱ्यात कोपिली आणि बराक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैजली जिल्ह्यातील कुवारा येथे बांध फुटलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी ‘ट्विट’ केले, की काल्दिया नदीमुळे झालेल्या पूरस्थितीचा आणि नुकसानीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला व त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ज्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचणे कठीण आहे त्यांच्यापर्यंत अन्नपदार्थ पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.

पाहा व्हिडीओ –

कच्छरचे उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितले, की प्राधिकरणाने नुकसानाचा आढावा घेण्यासाठी ‘ड्रोन’ सर्वेक्षण सुरू केले आहे. सिलचर महापालिका आणि इतर यंत्रणेसह जिल्हा प्रशासन शहरातील कचरा हटवत आहे. नागरिक आपली घरे आणि दुकाने साफ करत आहेत आणि कचरा रस्त्यावर फेकत आहेत. जल्ली यांनी रोगराई पसरू नये म्हणून घरातील कचरा रस्त्यावर न टाकण्याचे आवाहन केले. शहरातील २८ वॉर्डात वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना शुद्ध पाणी व पाणी शुद्ध करणाऱ्या गोळय़ा देण्यात आल्या आहेत.