राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) उत्तराखंडच्या पूरग्रस्त भागांतून १३०० हून अधिक लोकांची सुटका केली असून, बचाव पथकांची संख्या १५ वरून १७ पर्यंत वाढवली आहे, असे या दलाने बुधवारी सांगितले.

अतिवृष्टीतून उद्भवलेल्या घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत किमान ५२ लोक मरण पावले आहेत. या पर्वतीय राज्याच्या कुमाऊँ भागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला असून, त्यामुळे घरे कोलमडून पडली, काही पूल वाहून गेले आणि अनेकजण ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत.

‘उधम सिंग नगर व नैनिताल येथे अडकून पडलेल्या १३०० हून अधिक लोकांची एनडीआरएफने आतापर्यंत सुटका केली आहे. उत्तराखंडच्या पूरग्रस्त भागात हे दल मदत साहित्याचे वाटपही करत आहे’, असे या दलाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

सहा पथके उधमसिंग नगरमध्ये तैनात करण्यात आली असून, प्रत्येकी दोन पथके उत्तरकाशी व चमोली येथे, तर प्रत्येकी एक पथक डेहराडून, चंपावत पिथोरागढ व हरिद्वार येथे ठेवण्यात आले आहे. दोन पथके व एक उपपथक नैनितालमध्ये, तर एक उपपथक अल्मोडा येथे तैनात करण्यात आले आहे, असेही हा प्रवक्ता म्हणाला.