Florida University Netanyahu joke: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी युद्ध छेडले, सध्या या संघर्षात युद्धविराम लागू आहे. या युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह बिन्यामिन नेतान्याहू यांचे नाव जगभरात चर्चेत आले. पण, नेतान्याहू यांच्या नावाने थट्टा करणे एक विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले आहे. “नेतान्याहू आमच्या कॉलेजवर बॉम्ब टाका”, अशी व्हॉट्सॲप ग्रुपवर थट्टा करणाऱ्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. मस्करीत टाकलेल्या एक संदेश विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याने विद्यार्थिनीला थेट तुरुंगात जावं लागले आहे.

विद्यार्थिनीला अटक

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरिडा विद्यापीठातील पोलिसांनी २० वर्षीय विद्यार्थिनीला अटक केली आहे. गॅब्रिएला साल्डाना असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मियामी येथील मुख्य कॅम्पसजवळ तिला अटक करण्यात आली व नंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. विद्यार्थिनीने व्हॉट्सॲप ग्रुपवर बॉम्बचा संदेश केल्यानंतर लगेचच तिला अटक करण्यात आली. लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणे अथवा इजा पोहोचवण्याबाबत तिने वक्तव्य केल्याचा आरोप तिच्याविरोधात ठेवण्यात आला आहे.

नेमका संदेश काय पाठवला?

विद्यार्थिनीने केलेल्या वक्तव्य अथवा कृत्य समोरच्या व्यक्तीला, इतरांना खरे वाटावे अशा पद्धतीचे असल्याने तो संदेश गांभीर्याने घेण्यात आल्याचे याप्रकरणी समोर आलेल्या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री या विद्यार्थिनीने २१५ सदस्य असलेल्या विद्यापीठाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक संदेश पाठवला. ग्रुपवर सर्व विद्यार्थी विद्यापीठात होऊ घातलेल्या पदवीदान समारंभाबाबत बोलत होते. यावेळी या विद्यार्थिनीने “नेतान्याहू प्लीज तुम्ही आमच्या एफआययुवर बॉम्ब टाकता का? पुढच्या आठवड्यात परीक्षा आहेत आणि माझी तयारी झालेली नाही”, असा संदेश या विद्यार्थिनीने पाठवला.

कोर्टात काय घडलं?

विद्यार्थिनीला कोर्टात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी निरीक्षण नोंदवताना समोरच्या व्यक्तीला हा कितपत जोक वाटेल याबाबत शंका उपस्थित केली. “मला कळतंय की तू हे जोक म्हणून बोलली आहेस पण, प्रत्येकाला तो जोक वाटणार नाही. आणि हेच कारण पुरेसे आहे”, असे न्यायाधीश मिन्डी ग्लेझर म्हणाल्या. खटल्यादरम्यान सरकार हे सिद्ध करू शकेल की नाही हे मला माहीत नाही, परंतु या सुनावणीसाठी, मला वाटते की संभाव्य कारणाकरिता पुरेसे पुरावे आहेत,” असे न्यायाधीश पुढे म्हणाले. दरम्यान, विद्यार्थिनीला पाच हजार डॉलर्सच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.