Florida woman for selling human bones on Facebook Crime News : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका महिलेला तिच्या दुकानात आणि फेसबुक मार्केटप्लेसवरून मानवी हाडांची खरेदी-विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव किम्बर्ली अॅन शॉप्पर (Kymberlee Anne Schopper) असे असून ती ऑरेंज सिटीमध्ये विक्ड वंडरलँड नावाचे दुकान चालवते. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या अनेक खऱ्या मानवी हाडांची यादी ऑनलाईन आढळून आल्यानंतर या महिलेविरोधात मानवी टिश्यूंची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिलेने विक्रीसाठी ठेवलेल्या विचीत्र वस्तूंमुळे या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या महिलेने कवटी, बरगडी आणि व्हर्टे्ब्रे असे वेगवेगळी मानवी हाडे विक्रीसाठी ठेवली होती. विशेष म्हणजे यापैकी काहींची किंमत ३५ डॉलर्स इतकी कमी ठेवली होती.
असा समोर आला प्रकार
डिसेंबर २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकार्यांना दुकानाच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट्स पाठवण्यात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. फॉक्स ३५ ने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन यादीमध्ये पुढील गोष्टी आढळून आल्या होत्या.
दोन मानवी कवट्या – ९० डॉलर्स
क्लॅव्हिकल आणि स्कॅपुला- ९० डॉलर्स
बरगडी आणि व्हर्टेब्रे – प्रत्येकी ३५ डॉलर्स
अर्धवट मानवी कवटी – ६०० डॉलर्स
महिलेचा अजब दावा
जर शैक्षणिक मॉडेल असतील तर फ्लोरिडामध्ये हाडे विकणे कायदेशीर आहे असे आपल्याला वाटल्याचे महिलेने चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच महिलेने ही हाडे तीने गेल्या काही वर्षांमध्ये गोळा केली असून ती प्रायव्हेट कलेक्टर्सकडून मिळवल्याचा दावा केला. पण विचारणा करण्यात आल्यानंतर अशा व्यवहारांची कागदपत्रे मात्र या महिलेला सादर करता आली नाहीत.
“तिने दुकानात अनेक मानवी हाडांचे तुकडे असल्याची पुष्टी केली, पण अशी विक्री करणे हे फ्लोरिडा कायद्याच्या विरोधात असल्याचे माहिती नव्हते असेही तिने सांगितले,” असे पोलिसांनी सांगितले.
फॉक्स ३५ ने दिलेल्या वृत्तानुसार, फॉरेन्सिक चाचण्यांमधून आढळून आले की, महिलेकडे सापडलेल्या हाडांपैकी बरीचशी खूप जुनी आहेत. काही हाडे ५०० वर्ष जुनी आहेत आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही हाडे मूळात पुरातत्वीय असू शकतात, त्यामुळे महिलेने ही कशी आणि कुठून मिळवली याबद्दल चिंता निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान या महिलेला गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आणि दुसर्या दिवशी ७,५०० डॉलर्सच्या बॉन्डवर सोडण्यात आले. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून अधिकारी स्टेट आणि फेडरल एजन्सींबरोबर मिळून हे मानवी अवशेष नेमके कुठून आले याचा शोध घेत आहेत.