US Illegal Migrants Deportation Project Homecoming: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अवैध स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी सीमेवरील कॅम्पमध्ये असलेल्या स्थलांतरितांना विमानात भरून मायदेशी परत पाठवले गेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा लोकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अमेरिकेने मोफत विमान प्रवास आणि बोनस देण्याची योजना जाहीर केली आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात अवैध स्थलांतरितांना मोफत विमान प्रवास आणि २६०० डॉलर्स (२ लाख ४० हजार) देण्याची योजना जाहीर केली आहे.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (होमलँड सिक्युरीटी) शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये भारत आणि इतर देशांचा उल्लेख केला आहे. भारतासाठी जाहीर केलेल्या योजनेत अमेरिकेने ताज महालचा फोटो वापरला आहे. तसेच चीन आणि कोलंबियासाठी त्या त्या देशातील प्रमुख वास्तूंच्या चित्राचा वापर करण्यात आला आहे.
या योजनेला प्रोजेक्ट होमकमिंग असे नाव देण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर मे २०२५ पासून हा उपक्रम सुरू झाला.

मायदेशी परतून नवी सुरूवात करा
अमेरिकेत घुसलेल्या अवैध स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी स्व हद्दपारीची नवी योजना आता अमेरिकेने आणली आहे. यासाठी होमलँड सिक्युरिटीने ऑनलाईन मोहीम सुरू केली. “तुम्ही मायदेशी परतून नवी सुरूवात करू शकता. यासाठी मोफत विमान प्रवास आणि याबरोबर २६०० डॉलर्सचा एक्झिट बोनस मिळवू शकता”, अशी माहिती होमलँड सिक्युरिटीने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थलांतरितांनी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) ॲपचा वापर करावा आणि प्रक्रिया सुरू करावी, असा संदेश गृह सुरक्षा विभागाने दिला आहे. या ॲपद्वारे स्थलांतरित आपले नाव नोंदवून देश सोडण्याचे कारण सांगू शकतात, तसेच त्यांनी स्वतःची माहिती भरल्यानंतर त्यांच्या प्रवासाची सोय केली जाईल, तसेच या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक लाभ दिला जाईल.
गृह सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून जवळपास २२ लाख अवैध स्थलांतरितांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
अमेरिकेवर आर्थिक भार
अवैध स्थलांतरितांना त्याच्या मायदेशी धाडण्यासाठी अमेरिकेला सध्या प्रति व्यक्ती १८,२४५ डॉलर्सचा (जवळपास १७ लाख) खर्च येत होता. गृह विभागाच्या माहितीनुसार सीबीपी योजनेमुळे हा खर्च आता ५,१०० डॉलर्सवर आला आहे. यामुळे अमेरिकन करदात्यांचे प्रति स्थलांतरितामागे जवळपास १३,००० डॉलर्स वाचत आहेत.
सीबीपी योजनेनुसार, या योजनेद्वारे स्थलांतरितांना अटक, स्थानबद्धता आणि निर्बंधाशिवाय इतर सामान्य प्रवाशांप्रमाणेच घरी परतण्याची संधी दिली जाते. त्यामुळे हा एक सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे.
