Fly91 Flight Technical Glitch Hubli: गेल्या वर्षी अहमदाबाद येथे झालेला एअर इंडियाचा भीषण अपघात आणि जानेवारीत झालेला अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात कर्नाटकातून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. फ्लाय-९१ या विमान कंपनीच्या विमानात लँडिंगच्यावेळी निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल चार तास विमान हवेत घिरट्या घालत होते. यामुळे विमानातील प्रवासी पुरते घाबरुन गेले, अनेक प्रवाशांनी हात जोडून देवाचा धावा केला. चार तासांच्या या थरार नाट्यानंतर अखेर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले व मोठी दुर्घटना टळली.
तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग रद्द
समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लाय-९१ या विमान कंपनीचे विमान आयसी ३४०१ ने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथून रविवारी दुपारी तीन वाजता उड्डाण घेतले. हे विमान हुबळी येथे सायंकाळी साडेचार वाजता लँड होणार होते. हुबळी विमानतळावर लँडिंगच्या तयारीत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाला लँडिंग रद्द करुन विमान माघारी फिरवावे लागले. यानंतर सुमारे चार तास हे विमान हवेतच घिरट्या घालत होते.
चार तास हवेत घिरट्या
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. विमान चार तास हवेत असताना ते कर्नाटकातील मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागावरुन घिरट्या घालत होते. यावेळी विमानातील प्रवासी मात्र पूर्णपणे घाबरुन गेले होते. विमानात प्रवासी जिवाच्या अकांताने ओरडत, किंचाळत आणि देवाची प्रार्थना करत असतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. काही प्रवासी भीतीतून रडताना देखील समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहेत. काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत.
अखेर सुरक्षित लँडिंग
या घटनेनंतर सर्वत्र तीव्र संताप आणि फ्लाय-९१ या कंपनीविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. कंपनीकडून अक्षम्य दुर्लेक्ष आणि सविस्तर संपर्क करुन प्रवाशांना माहिती न देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, लँडिंगसाठी वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर विमान बंगळुरुला वळविण्यात आले. बंगळुरुतील कंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री साडेसात वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. पण, चार तास हवेत प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास केल्यानंतर पोटात भीतीने गोळा उठल्याचे अनुभव कथन केले.
