Captain Smit Machhar health update : फ्लायदुबईच्या विमानात सहपायलटने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीत आता वेगाने सुधारणा होत आहे. अबुधाबीहून दुबईतील रुग्णालयात हलवण्यात आलेल्या कॅप्टन मच्छार यांनी बुधवारी उपचारादरम्यान रुग्णालयात तब्बल १० पावले चालण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रकृतीत होत असलेल्या या सुधारणेमुळे कुटुंबीय आणि देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त वायोन न्यूजने दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून दुजोरा

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत कॅप्टन मच्छार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. “कॅप्टन मच्छार उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत असून, त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे,” असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तसेच, भारतीय दूतावास मच्छार यांचे कुटुंबीय, डॉक्टर आणि यूएईमधील स्थानिक प्रशासन यांच्या सतत संपर्कात असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय दूतावासानेही मंगळवारी त्यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक माहिती दिली होती.

नेमकी घटना काय होती?

दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईचे विमान हवेत असताना, ओमानी सहपायलट हमाम अल-हमामी याने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर अचानक हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात मच्छार यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. या जीवघेण्या आणि तणावपूर्ण परिस्थितीतही कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि संयम यांमुळे मोठा अनर्थ टळला.

विमानातून १७० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. हल्ल्यानंतर विमान सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर वळवून सुखरूप उतरवण्यात आले होते. या संकटकाळात विमानातील इस्रायलच्या एका दंतवैद्याने सुमारे ४५ मिनिटे कॅप्टन मच्छार यांच्या जखमांवर उपचार करून, रक्तस्राव थांबवण्यासाठी मोठी मदत केली होती, अशी माहिती नंतर समोर आली होती.

कॅप्टन स्मित मच्छार यांनी या गंभीर संकटावर मिळवलेला विजय आणि त्यांच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा पाहून सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात असतानाच त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करून, ते लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावेत, अशी सदिच्छाही व्यक्त केली जात आहे.