पीटीआय, नवी दिल्ली
‘फ्लायदुबई’च्या विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅप्टन मच्छार यांनी साहस दाखवून ९/११सारखा आणखी एक दहशतवादी हल्ला रोखला,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मच्छार यांचा उल्लेख ‘हिरो’ असा केला.
दुबईहून तेल अवीवला जाणार्या ‘फ्लायदुबई’च्या विमानातील कॉकपिटमध्ये ओमानच्या सहवैमानिकाने मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर अचानक चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि विमान खाली पाडण्याचा कट रचला. या हिंसक झटापटीत शरीरावर खोल जखमा होऊन गंभीर जखमी झाले असतानाही, कॅप्टन मच्छार यांनी हल्लेखोराचा निकराने प्रतिकार केला. त्यांनी मोठ्या धैर्याने कॉकपिटचा दरवाजा उघडला, ज्यामुळे बाहेर असलेल्या प्रवाशांना आणि कर्मचार्यांना आत येऊन हल्लेखोराला रोखणे शक्य झाले.
कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यामुळे विमानातील २७ लहान मुलांसह १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. त्यांच्या या धैर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. ‘कॅप्टन मच्छार यांनी सर्वोच्च प्रतीच्या साहसाचे दर्शन सार्या जगाला दाखविले. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अतिशय शौर्याने त्यांनी सामना केला आणि आणखी एक ९/११ सारखा हल्ला रोखला. कॅप्टन मच्छार यांना १४० कोटी जनता सलाम करीत आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत. सार्या जगाला त्यांच्याप्रति अभिमान आहे. स्मित यांना दीर्घ आयुष्य लाभावे, यासाठी नागरिकांनी प्रार्थना करावी, असे मी आवाहन करीत आहे. प्रत्येक भारतीयासाठी स्मित यांनी दाखविलेले साहस अभिमानाची बाब आहे,’ असे मोदी म्हणाले.
‘‘स्मित मच्छार यांनी आणीबाणीच्या प्रसंगी कॉकपिटचा दरवाजा उघडून मदत मागितली आणि विमान कोसळण्यापासून वाचवले. त्यामुळे ते ‘हिरो’ आहेत,’’ अशा शब्दांत अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रशंसा केली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मच्छार यांना लवकर बरे वाटू दे, अशी प्रार्थना केली. ‘‘सहवैमानिकाने भोसकल्यानंतरही त्याने त्याचा सामना केला, प्रतिकार केला. कॉकपिटचा दरवाजा उघडला. प्रवाशांना मदतीसाठी बोलावले आणि हल्लेखोरावर नियंत्रण मिळवले. आकाशातील एक मोठे संकट त्यामुळे टळले. भारतीय वैमानिक कप्तान मच्छार यांच्या अतुलनीय साहसाला माझा सलाम!’’ असे नेतान्याहू म्हणाले.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी कॅप्टन मच्छार यांची भेट घेतली. ‘‘मच्छार यांची प्रकृती चांगली आहे आणि त्यामध्ये सुधारणा होत आहे,’’ असे मित्तल यांनी समाजमाध्यमांवर लिहिले. तसेच मच्छार यांना वैद्यकीय उपचार आणि सहाय्य मिळवून दिल्याबद्दल यूईए सरकारचे आभार मानले.
प्रकृती स्थिर, अबूधाबीमध्ये उपचार
दुबई : भारतीय वैमानिक कप्तान स्मित मच्छार यांची प्रकृती स्थिर आहे. सौदी अरेबियातील तबुक येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र पुढील वैद्यकीय उपचार आणि प्रकृती सुधारण्यासाठी गुरुवारी रात्री त्यांना अबूधाबी येथे हलवण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. कॅप्टन मच्छार यांच्या प्रकृतीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशी माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
