‘फ्लायदुबई’ विमानाच्या कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात वाचलेले भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधताना विमान हजारो फूट खाली कोसळत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून कॉकपिटचा दरवाजा कसा उघडला, याची धक्कादायक माहिती दिली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या स्मित मच्छार यांच्या धैर्याचे जगभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही मच्छार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

“नमाज पठण करायचं आहे” असे सांगून सुरू केला हल्ला

कॉकपिटमध्ये नक्की काय घडले? हे सांगताना कॅप्टन मच्छार म्हणाले, “फ्लाईट FZ1073 चे उड्डाण अगदी सामान्य पद्धतीने सुरू होते. अचानक सह-वैमानिक हमाम अल-हममी याने नमाज पठण करायची असल्याचे सांगितले. सहकाऱ्याच्या श्रद्धेचा आदर राखत मी दुसरीकडे तोंड केले. परंतु, अवघ्या चार-पाच मिनिटांत माझ्या डोक्याच्या मागील भागावर जोरदार वार झाला.”

“सुरुवातीला मला वाटले की विमानात काही मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. पण लागोपाठ वार होऊ लागल्यावर माझ्या लक्षात आले की, विमानात बिघाड झालेला नसून माझ्या पाठीमागे उभा असलेला सहकारीच माझ्यावर हल्ला करत आहे,” असे मच्छार यांनी स्पष्ट केले.

विमान वेगाने खाली येत होते आणि…

या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे कॅप्टन मच्छार यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती. “माझी दृष्टी पूर्णपणे धुसर झाली होती. त्याच वेळी मला जाणवले की विमान वेगाने खालच्या दिशेने कोसळत आहे. कॉकपिटबाहेर प्रवाशांच्या किंचाळण्याचा आवाज येत होता,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले असतानाही त्यांनी जिद्द सोडली नाही. “माझ्यात अजूनही लढण्याची शेवटची ताकद बाकी होती. सर्व शक्ती एकवटून मी दरवाजाच्या दिशेने रांगत गेलो आणि आतून लॉक फिरवून दरवाजा उघडला. बाहेर प्रवासी आणि क्रू मेंबर्स मदतीसाठी तयारच होते,” असे त्यांनी सांगितले.

दोन प्रवासी वैमानिकांनी वाचवले शेकडो जीव

कॉकपिटचा दरवाजा उघडताच बाहेर असलेल्या प्रवाशांनी आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत माथेफिरू सह-वैमानिकाला पकडले. याच विमानात ‘डेडहेडिंग’ (दुसऱ्या ड्युटीसाठी प्रवास करणारे) म्हणून प्रवास करणाऱ्या फ्लायदुबईच्याच इतर दोन वैमानिकांनी तातडीने कॉकपिटचा ताबा घेतला आणि विमानाचे सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले.

‘डेडहेडिंग’ (Deadheading) म्हणजे काय?
विमान वाहतूक क्षेत्रात जेव्हा एखाद्या वैमानिकाला किंवा क्रू मेंबरला त्यांच्या पुढच्या ड्युटीच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी विमानाने प्रवासी म्हणून प्रवास करावा लागतो, त्याला ‘डेडहेडिंग’ म्हणतात. याच दोन अनुभवी वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

नेतान्याहूंकडून ‘इस्रायलच्या स्वातंत्र्यदिना’चे आमंत्रण

पंतप्रधान नेतान्याहू यांनी कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे तोंडभरून कौतुक केले. “तुम्ही शेकडो निष्पाप जीवांचे प्राण वाचवले आहेत. तुम्ही केवळ भारत आणि इस्रायलचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे हिरो आहात,” अशा शब्दांत नेतान्याहू यांनी मच्छार यांच्या शौर्याला सलाम केला. तसेच इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मुख्य मशाल पेटवण्यासाठी नेतान्याहू यांनी कॅप्टन मच्छार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आमंत्रण दिले आहे.

“डेंटिस्टने मला नवीन जीवन दिले”

चर्चेदरम्यान मच्छार यांनी तबूक येथे त्यांच्यावर प्रथमोपचार करणाऱ्या दंतचिकित्सकांचे (Dentist) आभार मानले. “त्या डॉक्टरांनी खरोखर माझे प्राण वाचवले आहेत, मला त्यांना पुन्हा भेटायला नक्की आवडेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सध्या कॅप्टन मच्छार यांच्यावर संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.

दहशतवादी हल्ला? तपास सुरू…

यूएईच्या तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सह-वैमानिक हमाम अल-हममी याने कॉकपिटमधील आपत्कालीन कुऱ्हाडीने (Crash Axe) कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला केला होता. हा एक ‘दहशतवादी हल्ला’ (Terrorist Attack) असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, ओमानचा नागरिक असलेल्या या सह-वैमानिकाच्या अतिरेकी विचारांमुळे त्याला यापूर्वीही ओमानमध्ये उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.