दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई ‘एफझेड १०७३’ विमानाच्या कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्याचा तपास सुरू असतानाच या प्रकरणात इराण कनेक्शन असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’कडून हल्लेखोराला प्रशिक्षण मिळालं असण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता ट्रम्प यांनी “असं होऊ शकतं” असे उत्तर दिले. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

फॉक्स न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत ट्रम्प यांनी ओमानी सहवैमानिकाचा इराणशी संबंध असल्याबाबतही, “माझ्या ऐकण्यात आले आहे त्यानुसार, हो” असे म्हटले. मात्र त्यांनी कोणतेही ठोस पुरावे सार्वजनिक केलेले नाहीत आणि तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘इराणचा हात आढळला तर जोरदार फटका देऊ’

ट्रम्प यांना या हल्ल्यामागे इराण असल्याचे तपासात समोर आल्यास अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी इराणला “अत्यंत कठोर” फटका दिला जाईल, असा इशारा दिला. मात्र सध्या इराण किंवा ‘आयआरजीसी’चा या घटनेशी संबंध असल्याचे अधिकृतपणे सिद्ध झालेले नाही. ट्रम्प यांचे वक्तव्य हे सध्या तपासात असलेल्या शक्यतेवर आधारित आहे.

कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं?

३० सप्टेंबरला दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘एफझेड १०७३’ विमानात ओमानी नागरिक असलेल्या सहवैमानिकाने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. कॅप्टन मच्छार गंभीर जखमी असूनही कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांनी सहवैमानिकाला नियंत्रणात घेतले. विमानाला सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

नेतान्याहू म्हणाले, ‘आत्ता निष्कर्ष काढणं घाईचं’

या घटनेत इराणचा सहभाग आहे का, याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. त्यांच्यानुसार, सहवैमानिकाचा इराणशी किंवा इतर कोणाशी संबंध होता का, हे शोधून काढणे आणि त्यावर आताच काही भाष्य करणे अतिशय घाईचे ठरेल. मात्र तपासातून काही दिवसांत अधिक माहिती समोर येऊ शकते, असं नेतान्याहू यांनी म्हटले. दरम्यान, त्यांनी सहवैमानिकाच्या पार्श्वभूमीबाबत कट्टरतावादी विचारसरणीशी संबंधित माहिती तपासात समोर आल्याचा दावाही केला आहे.

युएईकडूनही स्वतंत्र तपास

घटनेनंतर संयुक्त अरब अमिरातीनेही तपास सुरू केला आहे. हल्ल्याचा उद्देश काय होता, ही कृती पूर्वनियोजित होती का आणि दहशतवादी संघटनांशी कोणताही संबंध होता का, या सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. त्यामुळे सध्या ओमानी सहवैमानिकाचा इराण किंवा ‘आयआरजीसी’शी संबंध असल्याचा दावा हा तपासाचा एक भाग आहे, तो अद्याप सिद्ध झालेला नाही. तपासातून या हल्ल्यामागचा नेमका हेतू आणि कोणाचा सहभाग होता, हे स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.