Flydubai Cockpit Fight investigation: बुधवारी फ्लायदुबई विमान कंपनीच्या विमानात घडलेल्या धक्कादायक प्रकाराची सध्या जगभरात चर्चा पाहायला मिळत आहे. हे विमान इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये मोठी हाणामारी आणि शेवटी एका वैमानिकाने सहवैमानिकाला धारदार शस्त्राने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे खळबळ उडाली असून आता या प्रकरणाचे वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले आहेत. या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच विमान वाहतूक तज्ज्ञ संजय लाझर यांनी या घटनेमागे काहीतर फार गंभीर असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
काय घडलं ‘फ्लायदुबई’च्या विमानात?
दुबईहून तेल अवीवच्या दिशेनं या विमानानं उड्डाण केल्यानंतर ३४ हजार फूट उंचीवर विमान असतानाच कॉकपिटमध्ये पायलट व को-पायलट यांच्यात बाचाबाची सुरू झाली. काही क्षणांत या वादानं उग्र रूप धारण केलं आणि पायलटनं विमानातील को-पायलट स्मित मच्छार यांच्यावर जीवघेणार हल्ला केला. यामध्ये मच्छार गंभीर जखमी झाले. या प्रकाराचे विमानाच्या आतील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वादामुळे ३४ हजार फुटांवरून अवघ्या एका मिनिटांत विमान थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आलं. त्यामुळे विमानातल्या प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. आक्रमक झालेल्या पायलटला आवरल्यानंतर हे विमान सौदी अरेबियामध्ये सुखरूप उतरवण्यात आलं.
सुरुवातीच्या काही चर्चांनंतर या घटनेचे वेगवेगळे पैलू समोर आले. आक्रमक वैमानिकाचा हे विमान कोसळवण्याचा हेतू होता, असा निष्कर्ष काही प्राथमिक अंदाजांमधून काढला जात आहे. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील स्मित मच्छार यांनी ९/११ सारखा हल्ला होण्यापासून रोखल्याचं म्हणत स्मित मच्छार या भारतीय वंशाच्या वैमानिकाचं कौतुक केलं आहे. सध्या स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे आरोपी वैमानिकाचा हे सगळं करण्यामागे नेमका काय हेतू होता? याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
तज्ज्ञांना वेगळाच संशय, इस्रायलवर हल्ल्याचा प्रयत्न?
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी स्मित मच्छार यांचं कौतुक केलं आहे. इस्रायलवरील संभाव्य हल्ला आणि विमानातील सर्व इस्रायली प्रवाशांच्या जिविताचं रक्षण केल्याचं श्रेय स्मित मच्छार यांना दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूकविषयक तज्ज्ञ संजय लाझर यांनी पीटीआयशी बोलताना या संपूर्ण घटनाक्रमाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.
“आत्ता आपल्याला याबाबत निश्चित अशी माहिती नाही की कॉकपिटमध्ये हल्ला करणाऱ्या पायलटनं सोबत कुठलं शस्त्र नेलं होतं की नाही. कारण मला जी काही माहिती मिळाली आहे, त्यानुसार त्यानं को-पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करण्यासाठी क्रॅश अॅक्सचा वापर केला होता”, असं संदीप लाझर म्हणाले.
आरोपी पायलटनं खरंच क्रॅश अॅक्सचा वापर केला?
क्रॅश अॅक्स म्हणजे नेमकं काय? हे सांगताना संजय लाझर म्हणाले, “हे विमानाच्या सुरक्षेसाठी विमानात असणाऱ्या साहित्यांपैकी एक आहे. हे बहुतेक सर्वच विमानांमध्ये असतं. मग ते ७४७ असो, ७७७ असो किंवा मग ७३७ असो. कधी अपघातासारखी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तर त्याचा वापर कॅबिनमधून किंवा कॉकपिटमधून बाहेर पडण्यासाठी केला जातो. त्यामुळे क्रॅश अॅक्स हे काही शस्त्र नव्हे. पण त्याला खूप तीक्ष्ण अशी धार असते”.
“आरोपी पायलटनं को-पायलट स्मित मच्छार यांना मारण्यासाठी याच क्रॅश अॅक्सचा वापर केला की त्यानं सोबत एखादा चाकू वगैरे घेतला होता, याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही. पण मला असा संशय आहे की आरोपी पायलटनं विमानातील साहित्यांपैकीच कशाचातरी वापर करून स्मित मच्छारवर वार केले असावेत”, असा अंदाज संजय लाझर यांनी व्यक्त केला.
‘फ्लायदुबई’मार्फत दुसरं ९/११ घडवण्याचा कट?
संजय लाझर यांनी ‘फ्लायदुबई’ कंपनीत काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांच्या हवाल्याने आरोपी पायलटच्या हेतूबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. “फ्लायदुबई कंपनीतील माझ्या काही सहकाऱ्यांशी आणि वर्गमित्रांशी मी बोललो. ते फ्लायदुबईत कमांडर्स आहेत. त्या सगळ्यांना या प्रकरणाविषयी मिळालेल्या माहितीवरून त्यांची पूर्ण खात्री पटली आहे की हे विमान थेट इस्रायलमध्ये नेऊन तिथे कोसळवण्याचा हा कट होता. त्यामुळे हे काहीतरी फार फार भयंकर प्रकरण आहे. यात आता नेमकं काय घडतंय ते पाहायला हवं”, असं ते म्हणाले.
