दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ विमानामध्ये घडलेल्या थरारक घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्रवासी इंग्रजी आणि हिब्रू अशा मिश्र भाषेत ओरडताना दिसत आहेत. एका व्यक्ती “त्याने (आरोपी ओमानी वैमानिकाने) विमान पाडण्याचा प्रयत्न केला,” असे म्हणताना ऐकू येतं आहे. इतर लोक “त्याला बाहेर काढा,” असे ओरडताना दिसत आहेत. तसेच, आणखी एक व्यक्ती “खाली बसा,” असे ओरडताना ऐकू येते.
मात्र, भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी स्वतःवर हल्ला झालेला असतानाही अत्यंत शौर्याने हा कट उधळून लावला. या घटनेनंतर कॉकपिटबाहेर निर्माण झालेल्या गोंधळाचे दृश्य या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
इस्रायली दूरचित्रवाणी वाहिनीवर गुरुवारी प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये ‘फ्लायदुबई’च्या फ्लाइट १०७३ मधील प्रवाशांची झालेली धावपळ स्पष्ट दिसत आहे. कॉकपिटच्या दरवाजाजवळ प्रवाशांसह केबिन क्रूची मोठी गर्दी जमली असून, प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
“त्याने विमान पाडण्याचा प्रयत्न केला!”
या व्हिडिओमध्ये कॉकपिटच्या दरवाजाजवळ जमलेले प्रवासी इंग्रजी आणि हिब्रू भाषेत आरडाओरड करताना दिसत आहेत. “त्याने विमान पाडण्याचा प्रयत्न केला!” असा एक प्रवासी ओरडताना ऐकू येतो, तर इतर काही जण “त्याला बाहेर काढा” आणि “खाली बसा” असे सांगताना दिसतात. याच दरम्यान, विमानातील केबिन क्रूचे सदस्य तातडीने प्रथमोपचार किट उघडताना आणि विमानात उपस्थित असलेल्या इतर कोणत्याही वैमानिकाला किंवा डॉक्टरांना मदतीसाठी हाक मारताना दिसतात.
स्वतः जखमी असतानाही भारतीय वैमानिकाचे असीम शौर्य
कॉकपिटमध्ये घडलेल्या या थरारात, आरोपी ओमानी वैमानिकाने विमानावरील नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी आणि रक्ताळलेल्या अवस्थेतही कॅप्टन स्मित यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले.
दरवाजा उघडताच विमानातील इतर कर्मचारी आणि प्रवाशांनी कॉकपिटमध्ये धाव घेऊन आरोपी ओमानी वैमानिकाला पकडले व त्याच्यावर ताबा मिळवला. भारतीय वैमानिकाच्या या धाडसामुळेच विमानाचे सुरक्षित लँडिंग शक्य झाले आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. दरम्यान, हल्ला करणाऱ्या या संशयित ओमानी वैमानिकाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) हलवण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
