flydubai flight heroes pilot plumber : दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानात काल (३० सप्टेंबर) भीषण थरार घडला. ओमानच्या सहवैमानिकाने हे विमान पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, या विमानातील भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे स्मित मच्छार यांचं जगभर कौतुक होतंय. दरम्यान, स्मित मच्छार यांच्याबरोबर आणखी काहीजणांनी जीवाची बाजी लावत या विमानाला हायजॅक होण्यापासून आणि भीषण दुर्घटनेपासून वाचवलं आहे.

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या या विमानात १७४ प्रवासी होते. त्यामध्ये २७ मुले आणि सहा क्रू सदस्यांचा समावेश होता. विमानातील ओमानी सहवैमानिकाने स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला आणि विमानाचा ताबा घेऊन ते जमिनीवर आदळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्यानंतरही मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि विमानातील क्रूला सहवैमानिकाच्या कथित हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी आपत्कालीन संदेश दिल्यानंतर विमान सौदी अरेबियातील तबूक येथे वळवण्यात आले. सध्या मच्छार यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार इस्रायली प्रवाशांनी घेतला कॉकपिटमध्ये धाव

इस्रायलच्या Ynet वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चार इस्रायली नागरिकांनी कॉकपिटमध्ये धाव घेतली आणि सहवैमानिकाला आवरलं. त्यानंतर ड्युटीवर नसलेले दोन वैमानिक विमानाचा ताबा घेण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी सौदी अरेबियातील एका छोट्या विमानतळावर विमान सुरक्षित उतरवलं. या चार जणांमध्ये यानिव हायून, असफ राजुआन, झ्विका मानेस आणि दंतवैद्य शोटा मुसाएव यांचा समावेश होता.

यानिव हायून यांनी सहवैमानिकाला गळा आवळून कॉकपिटमधून दूर केलं आणि त्यानंतर विमानाचे नियंत्रण स्थिर करण्यास मदत केली. असफ राजुआन आणि झ्विका मानेस यांनीही क्रूच्या मदतीने हल्लेखोराला काबूत आणलं. तर दंतवैद्य शोटा मुसाएव यांनी गंभीर जखमी झालेल्या वैमानिकावर प्राथमिक उपचार करत त्यांचा रक्तस्राव थांबवला.

यानिव हायून

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी तेल अवीव विमानतळावर यानिव हायून यांची भेट घेतली. व्यवसायाने प्लंबर असलेले हायून विमानातून उतरताना त्यांच्या शर्टवर रक्ताचे डाग होते. मात्र, त्यांना स्वतःला दुखापत झाली नव्हती. नेतान्याहू यांच्याशी बोलताना हायून यांनी सांगितलं की, ते कॉकपिटमध्ये गेले आणि हल्लेखोराला विमानाच्या नियंत्रणापासून दूर केलं. त्यानंतर त्यांनी विमानाची दिशा स्थिर करण्यास मदत केली. कॉकपिटचा दरवाजा लॉक नव्हता. भारतीय वैमानिकाने तो आधीच उघडला असावा, असा अंदाज हायून यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “माझ्या मते, ते बेशुद्ध होण्यापूर्वी त्यांनी आमच्यासाठी दरवाजा उघडला असावा. त्यांनी अत्यंत प्रसंगावधान राखले.”

हायून यांच्या म्हणण्यानुसार, ते कॉकपिटमध्ये पोहोचले तेव्हा संशयित सहवैमानिक दोन्ही सीटच्या मधोमध विमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. वैमानिक आपल्या सीटवर नव्हते. त्यानंतर हायून यांनी सहवैमानिकाला पकडून नियंत्रणापासून दूर केलं. हल्लेखोर विमानाचे नियंत्रण निकामी करण्यासाठी ते नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता, असा दावाही त्यांनी केला. विमानाचा ताबा घेतल्यानंतर हायून यांनी नियंत्रणाचे योक मागे खेचून विमानाची दिशा स्थिर करण्याचा प्रयत्न केला. “मी ‘Mayday’ हा कार्यक्रम पाहतो,” असं त्यांनी सांगितलं.

असफ राजुआन

विमानातील आणखी एक प्रवासी असफ राजुआन हे थायलंडमधील सुट्टी संपवून परतत होते. मात्र, विमानातील परिस्थिती काही क्षणांतच एखाद्या भयपटासारखी झाली. ते म्हणाले, “आम्हाला शौचालयाजवळून आरडाओरडा ऐकू आला. एका मुलीची आई ओरडत बाहेर आली. त्यावेळी विमानात काहीतरी घडल्याचं आमच्या लक्षात आलं.” विमानाचा ताबा सुटल्यासारखं झालं आणि ते जवळपास ९० अंशांच्या कोनात खाली जाऊ लागले. विमानावर कोणाचंही नियंत्रण नसल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. कॉकपिटचा दरवाजा उघडा होता आणि आत रक्त दिसत होतं, असं राजुआन यांनी सांगितलं.

“माझ्याआधी झ्विका मानेस नावाचा एक व्यक्ती आत गेला होता. त्यानंतर मी आणखी दोन जणांसोबत कॉकपिटमध्ये गेलो. आम्ही हल्लेखोराला आवरण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला यश आलं”, असं त्यांनी सांगितलं. क्रूच्या मदतीने हल्लेखोराला सुमारे ५० मिनिटे नियंत्रणात ठेवलं आणि त्यानंतर विमान सौदी अरेबियात उतरवण्यात आलं, असंही राजुआन यांनी सांगितलं.

झ्विका मानेस

बँक लिउमीच्या अंडररायटिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले झ्विका मानेस हेही हल्लेखोराला रोखण्यासाठी पुढे आले होते. विमानात वितरित करण्यात आलेल्या मल्टिमीडिया हेडफोनच्या वायरचा वापर करून हल्लेखोराला बांधण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. “सगळीकडे रक्त होतं. भयपटांमध्ये दाखवतात तसं विमान वेगाने खाली येत होतं. लोक किंचाळत होते. वैमानिकाने विमान स्थिर करेपर्यंतची परिस्थिती अत्यंत कठीण होती”, असं मानेस यांनी सांगितलं. संशयित सहवैमानिक विमान जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे विमानातील लोक फेकले जात होते आणि आरडाओरडा सुरू होता, असंही त्यांनी सांगितलं.

“नंतर आम्ही त्याला बांधून निष्क्रिय केलं. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात शारीरिक ताकद वापरावी लागली. तो मजबूत होता आणि कदाचित अॅड्रेनालिनमुळे अधिक आक्रमक झाला होता”, असं मानेस म्हणाले.

दंतवैद्य शोटा मुसाएव यांनी वाचवला वैमानिकाचा जीव

दंतवैद्य शोटा मुसाएव यांनी सुरुवातीला कॉकपिटमध्ये धाव घेत हल्लेखोराला रोखण्यासाठी मदत केली. हल्लेखोराला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गंभीर जखमी झालेल्या भारतीय वैमानिकाकडे लक्ष दिलं. मुसाएव हे विमानातील एकमेव डॉक्टर होते. त्यांनी स्मित मच्छर यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं.

“त्यांची प्रकृती खूपच खराब होती. त्यांच्या डोक्यातून आणि हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. मी विमानातील एकमेव डॉक्टर होतो. मी त्यांचा रक्तस्राव थांबवला. लँडिंगच्या काही वेळ आधीपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर ती काहीशी बिघडली”, असं मुसाएव यांनी सांगितलं. CNN शी बोलताना त्यांनी मच्छार यांच्या जखमांचे गांभीर्य सांगितलं. त्यांच्या डोक्यावर आणि हातांवर मोठ्या प्रमाणात कापल्याच्या जखमा होत्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. “रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, ती अत्यवस्थ स्थितीत नव्हती”, असे मुसाएव म्हणाले.

जखमी असूनही मच्छर शुद्धीवर होते आणि विमानातील लोकांशी संवाद साधत होते. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या अवस्थेतही त्यांनी परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेशी संबंधित सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये विमानाच्या आतील भागात दोन जखमी आणि रक्तबंबाळ व्यक्ती जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत. या संपूर्ण घटनेत भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यासह प्रवाशांनी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं सांगितलं जात आहे.