दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या ‘FZ1073’ या विमानातील कॉकपिटमध्ये (वैमानिकाच्या केबिनमध्ये) झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगतात खळबळ उडाली आहे. या घटनेमागे इराणचा हात असण्याची शक्यता इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी पूर्णपणे नाकारलेली नाही. या संदर्भातील वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
बुधवारी फ्लायदुबई विमान कंपनीच्या विमानात घडलेल्या धक्कादायक प्रकाराची सध्या जगभरात चर्चा पाहायला मिळत आहे. हे विमान इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या दिशेने रवाना झाल्यानंतर कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये मोठी हाणामारी झाली. शेवटी सह-वैमानिकाने मुख्य वैमानिकावर धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे खळबळ उडाली असून आता या प्रकरणाचे वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले आहेत.
नेमकं काय घडलं ‘फ्लायदुबई’च्या विमानात?
दुबईहून तेल अवीवच्या दिशेने या विमानाने उड्डाण केल्यानंतर ३४ हजार फूट उंचीवर असतानाच कॉकपिटमध्ये पायलट व को-पायलट यांच्यात बाचाबाची सुरू झाली. काही क्षणांत या वादाने उग्र रूप धारण केले आणि सह-वैमानिकाने वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मच्छार गंभीर जखमी झाले. या प्रकाराचे विमानातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वादामुळे ३४ हजार फुटांवरून अवघ्या एका मिनिटात विमान थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आले, ज्यामुळे विमानावरील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. आक्रमक सह-वैमानिकाला आवरल्यानंतर हे विमान सौदी अरेबियामध्ये सुखरूप उतरवण्यात आले.
तज्ज्ञांना वेगळाच संशय, इस्रायलवर हल्ल्याचा प्रयत्न?
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी स्मित मच्छार यांचे कौतुक केले आहे. इस्रायलवरील संभाव्य हल्ला उधळण्याचे आणि विमानातील सर्व इस्रायली प्रवाशांच्या जिवाचे रक्षण करण्याचे श्रेय स्मित मच्छार यांना दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूकविषयक तज्ज्ञ संजय लाझर यांनी ‘पीटीआय’शी बोलताना या संपूर्ण घटनाक्रमाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
बिन्यामिन नेतान्याहू नेमकं काय म्हणाले?
“या घटनेत इराणचा सहभाग होता की नाही, हे आत्ताच ठामपणे सांगणे घाईचे ठरेल; मात्र तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत,” असे वक्तव्य बिन्यामिन नेतान्याहू यांनी केले आहे. संशयिताचे काही साथीदार होते का किंवा त्याचे तेहरानशी (इराणची राजधानी) काही थेट कनेक्शन होते का, याचा शोध सध्या तपास अधिकारी घेत आहेत. बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘सीबीएस’शी (CBS) संवाद साधला.
यावेळी बिन्यामिन नेतान्याहू यांनी कॉकपिटमध्ये घुसून विमान वाचवण्यात मदत करणाऱ्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या कृतींचीही सविस्तर माहिती दिली; तसेच हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत तपासकर्त्यांना आतापर्यंत काय माहिती मिळाली आहे आणि या घटनेचे सुरक्षेच्या दृष्टीने काय व्यापक परिणाम होतील, यावरही भाष्य केले.
