Flydubai Flight Attack Nina Manes Heroic Story: ‘फ्लायदुबई’च्या विमानात हजारो फूट उंचीवर घडलेल्या थरारक घटनेचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. एका सहा वर्षांच्या चिमुरडीच्या सतर्कतेमुळे विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचले असून, एका मोठ्या संभाव्य विमान अपघाताचा धोका टळल्याची माहिती समोर आली. नीना मानेझ असे या चिमुरडीचे नाव असून तिने दिलेल्या इशाऱ्यामुळे विमानातील हल्लेखोर वैमानिकाला वेळीच रोखण्यात यश आले.

‘फ्लायदुबई’चे ‘एफझेड १०७३’ हे ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने १७४ प्रवासी आणि सहा क्रू सदस्यांना घेऊन उड्डाण करत होते. उड्डाणादरम्यान ओमानच्या एका सहवैमानिकाने भारतीय वंशाचे मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. विमानाचा ताबा मिळवून घातपात करण्याचा या सहवैमानिकाचा प्रयत्न होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

शौचालयाबाहेर ऐकू आले किंचाळण्याचे आवाज

सहा वर्षांची नीना तिच्या आईबरोबर (ताली मानेझ) पुढील बाजूच्या शौचालयाकडे जात असताना ही घटना घडली. शौचालयाच्या बाहेर थांबलेल्या असतानाच त्यांना कॉकपिटमधून भांडणाचा मोठा आवाज आणि किंचाळणे ऐकू आले. ताली यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमध्ये सर्वत्र रक्त सांडलेले दिसत होते आणि आत झटापट सुरू होती.

नीनाने घाबरून आरडाओरड केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. तिचे वडील झ्विका मानेझ (बँक ल्युमीच्या अंडररायटिंग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि इतर दोन प्रवासी तात्काळ कॉकपिटच्या दिशेने धावले.

जखमी कॅप्टन मच्छार उघडले कॉकपिटचे दार

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांनी प्रसंगावधान राखत कॉकपिटचा दरवाजा उघडला. प्रवाशांनी तात्काळ आत घुसून चाकू हातात घेतलेल्या हल्लेखोर सहवैमानिकावर झडप घातली आणि त्याला दोरीने बांधून निष्प्रभ केले. या झटापटीदरम्यान विमान अचानक हजारो फूट खाली कोसळले होते; मात्र प्रवाशांनी तात्काळ विमानाचे संतुलन राखण्यास मदत केली. त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या एका सुट्टीवर असलेल्या वैमानिकाने विमानाचा ताबा घेत सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले.

या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी भारतीय वैमानिक आणि प्रवाशांच्या असीम धैर्याचे कौतुक केले असून, त्यांच्यामुळेच मोठी जीवितहानी टळल्याचे नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी संवाद

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जखमी वैमानिक स्मित मच्छार यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “संपूर्ण देश तुम्ही लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे. महामृत्यूंजयचा जाप सुरू आहे. तुमची हिंमत, धैर्य आणि चाणाक्ष वृत्तीमुळे अवघ्या काही सेकंदात घेतलेल्या निर्णयामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. तुमच्यामुळे आज संपूर्ण देश हे अभिमानाने सांगू शकतो की, “आम्ही भारतीय प्राण घेणारे नाही तर प्राण वाचविणारे लोक आहोत”, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.

स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धाडसाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सोशल मीडियावर लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. जर तुम्ही हे रोखले नसते, तर भारताबद्दल काय काय विचार केला गेला असता, याची कल्पनाही करता येत नाही, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. भारताच्या सर्व वैमानिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा झाला असता. तुम्ही हे सर्व काही होण्यापासून टाळले. तुम्ही खूप मोठे कार्य केले आहे.”