दुबईहून तेल अवीवच्या दिशेनं निघालेल्या ‘फ्लायदुबई’ विमान कंपनीच्या विमानाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन पायलटमध्ये झालेली हाणामारी, मुख्य पायलटनं को-पायलटवर धारदार शस्त्राने केलेला वार आणि त्यानंतर विमानातील १७४ प्रवाशांमध्ये निर्माण झालेली प्रचंड भीत या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा चालू असून यामागे नेमका कुणाचा हात आहे? यावरदेखील तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांना विमानात इतका सगळा प्रकार झाल्यानंतरदेखील हे विमान सुरक्षितपणे सौदी अरेबियातील विमानतळावर कसं उतरलं? याचं आश्चर्य वाटत आहे.

काय आहे ‘फ्लायदुबई’ विमानातील नेमकी घटना?

बुधवारी सकाळी दुबईहून तेल अवीवच्या दिशेनं या विमानानं उड्डाण केलं. काही वेळातच कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये हाणामारी आणि वाद होत असल्याचे आवाज बाहेर येऊ लागले. कॉकपिटमध्ये मुख्य वैमानिकाने को-पायलट स्मित मच्छार यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. मात्र, जखमी अवस्थेतदेखील स्मित मच्छार यांनी आरोपी पायलटला रोखून धरलं. काही प्रवाशांनीदेखील यादरम्यान मध्ये पडत आरोपी पायलटला अडवलं.

पण कॉकपिटमध्ये हा सगळा प्रकार चालू असताना बाहेर विमानाच्या केबिनमध्ये मात्र १७४ प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. कारण कॉकपिटमधल्या या प्रकारामुळे विमान एका मिनिटात ३४ हजार फुटांवरून थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आलं. यातलं १६ हजार फूट अंतर तर विमानानं अवघ्या काही सेकंदांत पार केलं. विमान इतक्या वेगाने इतक्या खाली आल्यामुळे अपघाताची पूर्ण शक्यता प्रवाशांना वाटू लागली. केबिनमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. मात्र, को-पायलट स्मित मच्छार यांनी प्रयत्नपूर्वक विमान आधी हवेत स्थिर केलं आणि त्यानंतर सौदी अरेबियाच्या दिशेनं वळवून तिथे विमानाचं सुखरुप लँडिंग केलं.

काही सेकंदात हजारो फूट खाली आलं, पण तरीही वाचलं!

पण अवघ्या एका मिनिटात १७ हजार फूट खाली येताना विमानाचा प्रचंड वेग असणार यात शंका नाही. तरीदेखील या कोसळण्यातून सावरून विमान सुरक्षितपणे सौदी अरेबियात कसं उतरलं? या प्रश्नामुळे तज्ज्ञदेखील चक्रावले आहेत. या घटनेसंदर्भात युनायडेट एअरलाईन्सचे वैमानिक व हवाई वाहतूक सुरक्षा तज्ज्ञ स्टीव्ह अर्रोयो म्हणाले, “इतक्या उंचावरून काही क्षणांत इतक्या खाली येणं अत्यंत गंभीर होतं. त्यामुळे विमानाच्या दिशादर्शक रडारवर प्रचंड ताण निर्माण झाला असणार. मला तर याचंच आश्चर्य वाटतंय की ते विमान सुखरूप लँड कसं झालं?” अशी प्रतिक्रिया अर्रोयो यांनी एपी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

इतक्या खाली येऊनही विमान स्थिर करणं विशेष – जेफ गझेटी

दरम्यान, हवाई वाहतूक तज्ज्ञ जेफ गझेटी यांनीदेखील विमानाच्या सुरक्षित लँडिंगबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. “जर विमान १५ हजारांऐवजी १० हजार फुटांपेक्षा खाली आलं असतं, तर मात्र विमान वाचणं कदाचित शक्य होऊ शकलं नसतं. अगदी एका मिनिटात १७ हजार फूट खाली येऊनदेखील त्यांनी विमान पुन्हा स्थिर करण्यात यश मिळवलं हे उल्लेखनीय आहे. त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब जमिनीपासून शिल्लक राहिलेली उंची ही ठरली. त्यांना विमान पुन्हा स्थिर करण्यासाठी जमिनीपासून १५ ते १६ हजार फुटांची उंची शिल्लक होती”, असं ते म्हणाले.

हा तर आत्महत्येचा प्रयत्न – सनत कौल

दरम्यान, भारतीय हवाई वाहतूक तज्ज्ञ सनत कौल यांनी तर हा थेट आत्महत्येचा प्रयत्न असल्याचं नमूद केलं आहे. “हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या त्या पायलटचा आत्महत्येचाच प्रयत्न होता. कॉकपिटमध्ये बसलेल्या भारतीय पायलटनं ती परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. ही काही अशा प्रकारची पहिली घटना नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. इजिप्शियन एअरलाईन्सच्या बाबतीतही असं घडलं आहे. त्या पायलटनं असं का केलं? आणि त्यावेळी नेमकं कॉकपिटमध्ये काय घडलं? याची सविस्तर चौकशी व्हायला हवी”, असं कौल यांनी एएनआयशी बोलताना नमूद केलं.