Flydubai Flight Hijack Maldives Pilots Detained : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई कंपनीच्या विमानात वैमानिकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा तपास सुरू आहे. मात्र, आता या प्रकरणात वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. फ्लायदुबई विमानाच्या कथित हायजॅक आणि चाकू हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

यूएईच्या सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान मालदीवच्या दोन वैमानिकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात सह-वैमानिकाने भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करून विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून यूएईच्या सुरक्षा यंत्रणांनी आता मालदीवच्या दोन वैमानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

फ्लायदुबई विमानाच्या वैमानिकांवरील हल्ल्याच्या प्रकरणात मालदीवच्या दोन वैमानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. मालदीवच्या अधाधु या न्यूज वेबसाईटच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ३ ऑक्टोबर रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये या दोन मालदीवच्या वैमानिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पण त्यांची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधील मालदीवच्या दूतावासाने या दोन वैमानिकांच्या कुटुंबीयांना याबद्दल अधिकृतपणे माहिती दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे. पण याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. हे दोन वैमानिक आणि या घटनेतील मुख्य आरोपी यांचा संबंध असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मालदीवमधील Mihaaru या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हे दोन वैमानिक मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याचा संशय असून हे दोन्ही वैमानिक आरोपीच्याच इमारतीत राहत होते. त्यामुळे या दोन वैमानिकांचा मुख्य आरोपीशी काही संबंध आहेत का? किंवा आरोपीबाबत त्यांच्याकडे काही माहिती आहे का? याबाबत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं होतं?

दुबईमधून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ या विमान कंपनीच्या एका विमानात धक्कादायक घटना घडली होती. विमानामध्ये वैमानिकावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर हे विमान हायजॅक झाल्याची भीती आधी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या विमानातील दोन्ही वैमानिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती त्यानंतर समोर आली. या घटनेनंतर हे विमान सौदी अरेबियामध्ये उतरवण्यात आलं होतं. या विमानात एकूण १७४ प्रवासी होते.