दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ विमानातील कॅप्टनवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतरचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. ३० हजार फूट उंचीवर हवेत असताना कॉकपिटमध्ये घडलेल्या या हल्ल्यामुळे विमानात प्रचंड घबराट पसरली होती. या व्हिडिओमध्ये जखमी भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार रक्ताच्या थारोळ्यात दिसत असून, “त्याने माझ्यावर वारंवार वार केले,” असे सांगताना त्यांचा वेदनादायी आवाज ऐकू येत आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

३० हजार फूट उंचीवर कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं होतं?

३० सप्टेंबर रोजी ‘फ्लायदुबई’चे ‘FZ1073’ हे बोईंग ७३७ मॅक्स ८ (Boeing 737 MAX 8) विमान १७४ प्रवाशांना घेऊन दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जात होते. उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये असलेल्या ओमानी सह-पायलटने अचानक मुख्य कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला.

हल्ल्यादरम्यान सह-पायलटने विमानाचे नियंत्रण बिघडवल्यामुळे विमान अवघ्या एका मिनिटात तब्बल १४ हजार फूट खाली कोसळले. यामुळे विमानात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गंभीर जखमी असतानाही दाखवले शौर्य

शरीरावर अनेक गंभीर जखमा आणि प्रचंड रक्तस्त्राव होत असतानाही कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने कॉकपिटचा दरवाजा उघडणारा मुख्य ‘डोर रिलीज’ स्विच ऑन केला. कॉकपिटचा दरवाजा उघडताच बाहेर असलेल्या केबिन क्रू आणि प्रवाशांनी तातडीने आत धाव घेतली आणि सह-पायलटला पकडले.

समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये कॅप्टन मच्छार यांना ऑक्सिजन मास्क लावला जात असून त्यांच्यावर प्रथमोपचार केले जात आहेत. “माझा हात हलतोय, पण मला मूठ आवळता येत नाहीये,” असेही ते या व्हिडिओत सांगताना दिसतात.

हेडफोनच्या वायरने सह-पायलटला बांधले

प्रवाशांनी दाखवलेल्या शौर्यामुळे मोठा विमान अपघात टळला. कॉकपिटमध्ये घुसलेल्या तीन धाडसी प्रवाशांनी हल्लेखोर सह-पायलटला पकडून खाली पाडले. विमानातील हेडफोनच्या केबल्सचा (वायरी) वापर करून प्रवाशांनी त्याचे हात आणि पाय घट्ट बांधले.

“आम्ही त्या दहशतवाद्याला रोखले असून त्याला बांधून ठेवले आहे,” अशी माहिती विमानातील एका प्रवाशाने व्हिडिओ संदेशाद्वारे दिली. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, त्याने सह-पायलटला मागून पकडले आणि विमानाचे मुख्य नियंत्रक त्याच्या हातातून हिसकावून घेतले.

सौदी अरेबियामध्ये इमर्जन्सी लँडिंग

या अभूतपूर्व घडामोडीनंतर विमान तातडीने सौदी अरेबियातील ‘तबूक’ विमानतळाकडे वळवण्यात आले आणि तेथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

लँडिंगनंतर सौदी पोलिसांनी आरोपी सह-पायलटला तात्काळ अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या तपासात इस्रायली गुप्तचर यंत्रणाही सहभागी झाल्या आहेत. जखमी कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सौदीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हवेत घडलेल्या या अत्यंत दुर्मिळ आणि भयानक घटनेमुळे आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.