दुबईमधून तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबई कंपनीचे विमान आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर माघारी वळवण्यात आले आहे. बुधवारी सौदी अरेबियावरून उड्डाण करत असताना आपत्कालीन संदेश प्राप्त झाल्यानंतर विमान वळवण्यात आल्याचे वृत्त फ्लाइट-ट्रॅकिंग डेटा आणि इस्रायली सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

हायजॅकची घटना नसल्याचे स्पष्टीकरण

विमान हायजॅक झाल्याची भीती निर्माण झाली आणि विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियामध्ये उतरवण्यात आले. या घटनेमुळे इस्रायलने तात्काळ आपली लढाऊ विमाने आकाशात तैनात केली. तसेच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सुरक्षेशी संबंधित तातडीची बैठक घेतली. मात्र, ही घटना हायजॅकची नव्हती, असे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने नंतर स्पष्ट केले, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. ‘रॉयटर्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या तीन सुरक्षा अधिकाऱ्यांनी नेतन्याहू यांनी या घटनेबाबत माहिती घेतल्याचे सांगितले.

दोन वैमानिकांमध्ये वाद

Ynet या इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानात २७ मुलांसह एकूण १७४ प्रवासी होते. दोन्ही वैमानिकांमध्ये झालेल्या हाणामारीत इमर्जन्सीचा सिग्नल पाठवण्यात आला. दरम्यान, यानंतर विमान सौदी अरेबियात सुखरूप उतरले.

इमर्जन्सी कोड

विमानातून विमानाने सुरुवातीला ‘७७००’ हा आंतरराष्ट्रीय इमर्जन्सीचा कोड पाठवला. त्यानंतर लगेच विमान हायजॅक झाल्याचा किंवा हस्तक्षेपाचा इशारा देणारा ‘७५००’ हा कोड पाठवला गेला. हा संदेश आल्यानंतर इस्रायलकडे जाणारे हे विमान सौदी अरेबियाच्या दिशेने मागे फिरले. विमानाची उंची कमी करण्यात आली आणि शेवटी ते सौदी अरेबियात उतरले. सुरुवातीला इस्रायली अधिकाऱ्यांनी ही घटना हायजॅकची असू शकते असे गृहीत धरुन लढाऊ विमाने पाठवली आणि विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षा अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

एका इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, विमान हायजॅक झाल्याची कोणतीही निश्चित माहिती नव्हती. परंतु पायलटशी संपर्क होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे Ynet च्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार हायजॅकचा नसून दोन्ही पायलटमधील भांडणामुळे घडला होता, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.