फ्लाय दुबईच्या विमानात जो थरार रंगला होता त्यातून मुख्य कॅप्टन स्मित मच्छार यांनी १७० हून अधिक लोकांचा जीव वाचवला. ओमानचा रहिवासी असलेला सह-वैमानिक हम्माम अल-हम्मामी याने आधी मुख्य कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. कॅप्टनला ठार करून विमान थेट तेल अवीवमधील एका उंच इमारतीवर धडकवण्याची त्याची योजना होती. मात्र, कॅप्टन मच्छार यांनी रक्ताने माखलेल्या अवस्थेतही प्रतिकार केला, ज्यानंतर स्मित मच्छार यांचं जगभरातून कौतुक झालं. आता याच स्मित मच्छार यांच्यावर सौदीमध्ये एक तातडीची शस्त्रक्रिया पार पडली आहे.

नेमकी कुठली शस्त्रक्रिया स्मित मच्छार यांच्यावर करण्यात आली?

स्मित मच्छार यांच्यावर कवटीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कवटीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. त्यांच्या अंगावर जखमा असल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तसंच हल्ल्यात स्मित मच्छार यांच्या कवटीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. कवटीतलं एक हाड मेंदूच्या दिशेने गेलं होतं. पण मेंदूला इजा झाली नव्हती, असं काही घडू नये म्हणून ही शस्त्रक्रिया पार पडली. NDTV ने हे वृत्त दिलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नेमकी घटना काय घडली?

ओमानचा रहिवासी असलेला सह-वैमानिक हम्माम अल-हम्मामी याने आधी मुख्य कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. कॅप्टनला ठार करून विमान थेट तेल अवीवमधील एका उंच इमारतीवर धडकवण्याची त्याची योजना होती. मात्र, कॅप्टन मच्छार यांनी रक्ताने माखलेल्या अवस्थेतही प्रतिकार केला. कट उधळला जात असल्याचे दिसताच सह-वैमानिकाने विमान वाळवंटात पाडण्याचा प्रयत्न केला. त्याने ऑटो-पायलट सिस्टीम बंद करून विमानाचे नियंत्रण अचानक खाली झुकवले. अवघ्या ३० सेकंदांत विमान १६ हजार फूट खाली आले आणि विमानाचा वेग ताशी ९७० किलोमीटरच्या पुढे गेला. यामुळे विमानाचा शेपटाकडील भाग (टेल रडर) अपघातग्रस्त झाला.

कॅप्टन स्मित मच्छार यांना मागच्या आठवड्यात सौदी अरेबियातून अबूधाबी या ठिकाणी असलेल्या रूग्णालयात एअर लिफ्ट करण्यात आलं होतं. येथील मिलिट्री रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत आणि उपचारांना स्मित मच्छार चांगला प्रतिसाद देत आहेत अशीही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात स्मित मच्छार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉलवर चर्चा केली होती.