Flydubai Israel Flights Ban Captain Smit Machhar Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर झालेल्या गंभीर हल्ल्यानंतर, ‘फ्लायदुबई’ विमान कंपनीने इस्रायलमधील आपली विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, इस्रायलने ही मागणी सध्या फेटाळून लावली आहे. ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या या गंभीर घटनेनंतर इस्रायलकडून परदेशी विमान कंपन्यांच्या क्रू सदस्यांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेतला जात आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
फ्लायदुबईची विनंती इस्रायलने फेटाळली
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरच्या घटनेचा अंतर्गत तपास जवळपास पूर्ण झाला असून, या प्रकरणात दोषी आढळलेल्या काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती फ्लायदुबईने इस्रायली अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागितली. परंतु, इस्रायलच्या परिवहन मंत्री मिरी रेगेव्ह यांनी सध्या ही उड्डाणे सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान, इस्रायली परिवहन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात दुबईला भेट देण्याचे निमंत्रणही कंपनीने दिले आहे.
कॉकपिटमध्ये नेमकी काय घडली होती घटना?
३० सप्टेंबर रोजी दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणारे ‘एफझेड १०७३’ विमान हवेत असताना, सहपायलट हमाम अल-हमामी याने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्येच अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर प्रसंगावधान राखून विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळाकडे वळवण्यात आले आणि सुरक्षितपणे उतरवण्यात आले. कॅप्टन मच्छार यांनी कसाबसा कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर प्रवासी आणि इतर क्रू सदस्यांनी मिळून हल्लेखोर सहपायलटला पकडले आणि नियंत्रणात आणले होते. या घटनेनंतर फ्लायदुबईने इस्रायलमधील आपली सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली होती.
परदेशी क्रूसाठी येऊ शकतात कडक सुरक्षा नियम
या भीषण घटनेमुळे इस्रायलमध्ये परदेशी विमान कंपन्यांच्या पायलट आणि क्रू सदस्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘चॅनेल १३’च्या वृत्तानुसार, इस्रायल सरकार आता नवीन सुरक्षा नियमावली आणण्याच्या विचारात आहे. प्रस्तावित नियमांनुसार, इस्रायली नागरिक नसलेल्या पायलट आणि क्रू सदस्यांना विमान उड्डाणाच्या किमान ४८ तास आधी एक सविस्तर माहिती फॉर्म सादर करावा लागू शकतो. तसेच, ‘रेड’ श्रेणीत समाविष्ट असलेल्या देशांमधील क्रू सदस्यांची अतिरिक्त व कडक सुरक्षा तपासणी इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ‘मोसाद’ आणि ‘शिन बेट’ यांच्याकडून केली जाऊ शकते, अशीही माहिती समोर आली आहे.
फ्लायदुबईने उड्डाणे स्थगित केली होती
हल्ल्यानंतर फ्लायदुबईने इस्रायलमधील आपली उड्डाणे तात्पुरती स्थगित केली होती. कंपनीने ही कारवाई अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार करण्यात आल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर परदेशी पायलट आणि क्रू सदस्यांची सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्याबाबत इस्रायली सरकारकडून आढावा सुरू आहे.
