“एका क्षणासाठी मला वाटलं होतं की मी आता जिवंत वाचत नाही. पण नंतर मी स्वतःलाच सांगितलं…स्मित, काहीतरी कर, असा पराभव स्वीकारून मरू नकोस”, फ्लायदुबई विमानातील कॉकपीटमधल्या अत्यंत भीषण प्रसंगातून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला आहे. विमानात सह-वैमानिकाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मृत्यूला हुलकावणी देत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले. ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर पहिल्यांदाच कॅप्टन स्मित मच्छार यांनी ‘स्काय न्यूज अरेबिया’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना कॉकपीटमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

३० सेकंद आणि १४ हजार फूट खाली येणारे विमान

दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘FZ1073’ या विमानात ओमानच्या सह-वैमानिकाने अचानक कॉकपीटमध्येच मुख्य वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मच्छार रक्ताच्या थारोळ्यात पडले. कॉकपीटचा ताबा सुटल्याने अवघ्या ३० सेकंदांत विमान तब्बल १४,००० फूट खाली आले. विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. गंभीर जखमी अवस्थेतही स्मित मच्छार यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी प्रसंगावधान राखून कॉकपीटचे मुख्य दार उघडले, जेणेकरून बाहेर असलेले इतर सहकारी आणि प्रवासी आत येऊ शकतील.

“मी मरेपर्यंत हा क्षण विसरू शकणार नाही”

कॉकपीटचे दार उघडताच बाहेर असलेल्या काही प्रवाशांनी आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी त्या ओमानी सह-वैमानिकाला जागीच पकडले आणि बांधून ठेवले. या घटनेची आठवण सांगताना कॅप्टन मच्छार म्हणाले, “माझ्या सहकाऱ्याने ज्या पद्धतीने त्वरित विमानाचे नियंत्रण हातात घेतले आणि परिस्थिती सावरली, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याने दाखवलेले हे शौर्य आणि घेतलेले निर्णय मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकणार नाही.”

सौदी अरेबियामध्ये सुरक्षित लँडिंग

विमानात उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या वैमानिकाने तातडीने विमानाचे नियंत्रण हातात घेतले, तर एका डॉक्टर प्रवाशाने जखमी स्मित मच्छार यांच्यावर प्रथमोपचार केले. वैमानिक आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे १७४ प्रवासी असलेले हे विमान सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सध्या संयुक्त अरब अमिरातीमधील अबु धाबी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. विमानातील शेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या भारतीय वैमानिकाच्या आणि त्यांच्या टीमच्या शौर्याचे जगभरातून कौतुक केले जात आहे.