Captain Smit Machhar Flydubai attack family reaction : फ्लायदुबईच्या विमानातील धक्कादायक घटनेनंतर भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सह-वैमानिकाने कॉकपिटमध्ये त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर विमान अचानक खाली येऊ लागले. गंभीर जखमी असूनही मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवाशांनी आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. काही ऑफ-ड्युटी वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण घेतल्यानंतर ते सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षित उतरवण्यात आले. या घटनेत विमानातील सुमारे १८० जण सुरक्षित राहिले. दरम्यान या घटनेबद्दल स्मित मच्छार यांच्या सासऱ्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘विमान कोसळलं असतं तर चुकीचा संदेश गेला असता’

स्मित मच्छार यांचे सासरे जयसुख जोगी यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. “विमान कोसळलं असतं तर जगात चुकीचा संदेश गेला असता की, भारतीय वैमानिकाच्या नेतृत्वाखाली विमान दुर्घटनाग्रस्त झालं. त्यामुळे स्मितने समाजासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी मोठं काम केलं आहे. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे,” असे त्यांनी सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. “आम्ही खूप घाबरलो होतो. नंतर बातम्या येऊ लागल्यानंतर थोडा दिलासा मिळाला. पण संपूर्ण रात्र तणावात गेली. आम्हाला त्याच्याशी बोलूही दिलं जात नव्हतं,” असे जोगी यांनी सांगितले.

‘ही घटना चमत्कारापेक्षा कमी नाही’

“त्या कठीण प्रसंगात इतर पाच जणांनी मिळून हल्लेखोराला रोखण्यात जी मदत केली, तो खरोखरच एक चमत्कार होता, कारण अशी घटना सहसा घडत नाही. मी सोशल मीडियावर अनेकांचे व्हिडिओ पाहिले आहेत आणि प्रत्येकाचे हेच म्हणणे आहे की हा एक चमत्कारच आहे. त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडला होता, मात्र त्यानंतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे मिळून सर्वांचे प्राण वाचवले. देवानेच या संकटातून प्रत्येकाचे रक्षण केले”, असे स्मित यांच्या सासऱ्यांनी या प्रसंगाचे वर्णन करताना सांगितले.

‘स्मित खूप भावनिक आहे’

स्मित यांच्या सासू वर्षा जोगी यांनीही त्यांच्याबद्दल सांगताना ते कुटुंबाची विशेष काळजी घेतात, असे म्हटले. त्यांच्या मते, स्मित स्वभावाने भावनिक आहेत आणि आई-वडील, मुलं तसेच पत्नी सोनल यांची ते विशेष काळजी घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मित यांच्याशी रुग्णालयातून व्हिडीओ कॉलवर संवाद साधल्यानंतर ते भावुक झाल्याचेही वर्षा जोगी यांनी सांगितले.

जखमी अवस्थेतही उघडला कॉकपिटचा दरवाजा

२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या स्मित मच्छार यांच्याशी संवाद साधला. या संभाषणात मच्छार यांनी हल्ल्याचा अनुभव सांगितला. गंभीर जखमी होऊन ते जमिनीवर पडले होते. मात्र विमान खाली येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दरवाजा उघडल्यानंतर प्रवासी आणि इतर कर्मचारी आत आले आणि हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले.

‘हनुमान चालीसा म्हणत होतो’

पंतप्रधान मोदींशी बोलताना स्मित यांनी संकटाच्या त्या क्षणी आपण हनुमान चालीसा म्हणत असल्याचे सांगितले. “जेव्हा मला वेदना होतात तेव्हा मी हनुमान चालीसा म्हणतो. त्या वेळीही मी हनुमान चालीसाच म्हणत होतो,” असे त्यांनी सांगितले.

मोदी यांनी स्मित यांच्या धैर्याचे, प्रसंगावधानाचे आणि संयमाचे कौतुक केले. जखमी अवस्थेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

‘तुमच्यामुळे भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला’

स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धाडसाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सोशल मीडियावर लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. जर तुम्ही हे रोखले नसते, तर भारताबद्दल काय काय विचार केला गेला असता, याची कल्पनाही करता येत नाही, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. भारताच्या सर्व वैमानिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा झाला असता. तुम्ही हे सर्व काही होण्यापासून टाळले. तुम्ही खूप मोठे कार्य केले आहे.”

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू आहे. सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला केल्यानंतर विमानाची उंची झपाट्याने कमी झाली होती. अखेरीस विमानाचे नियंत्रण पुन्हा मिळवण्यात आले आणि ते सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षित उतरवण्यात आले.