सहवैमानिकानेच घडवून आणलेला भीषण अपघात प्रसंगावधान आणि अफाट शौर्याच्या जोरावर उधळून लावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीबाबत केंद्र सरकारने अधिकृत माहिती दिली आहे. सौदी अरेबियातील प्राथमिक उपचारानंतर आता त्यांना पुढील उपचारांसाठी अबुधाबी येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
या थरारात गंभीर जखमी होऊनही त्यांनी तब्बल १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इस्रायली राजदूतांनी कॅप्टन स्मित यांच्या या अद्भुत साहसाचे कौतुक केले असून, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय कॅप्टन मच्छार यांच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवून आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) भारताच्या राजदूतांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन कॅप्टन मच्छार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यापूर्वी भारतीय राजदूतांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन, कॅप्टन यांच्या आरोग्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.
अबुधाबीमध्ये पुढील उपचार सुरू
विमानाच्या आपत्कालीन प्रसंगात दाखवलेल्या प्रसंगावधानात कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाले होते. घटनेनंतर लगेचच सौदी अरेबियातील तबूक येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक चांगल्या वैद्यकीय काळजीसाठी त्यांना अबुधाबी येथे हलवण्यात आले आहे. सध्या अबुधाबीमधील भारतीय दूतावास आणि दुबईतील भारतीय महावाणिज्य दूतावास हे स्थानिक प्रशासन व वैद्यकीय टीमच्या सतत संपर्कात आहेत.
जगभरातून कौतुकाचा वर्षाव
कॅप्टन स्मित मच्छार यांनी संकटसमयी दाखवलेल्या अचाट धैर्याचे आणि कौशल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने पुनरुच्चार करत कौतुक केले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत शेकडो जीवांचे रक्षण करणाऱ्या त्यांच्या या शौर्याचे भारतातच नव्हे, तर जगभरातून कौतुक केले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही जगभरातून मिळणाऱ्या या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
