फ्लायदुबई विमानात घडलेल्या हल्ल्याच्या कटाबाबत एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या नेतृत्वाखाली सुरू असून, यूएईचे ॲटर्नी जनरल हमद सैफ अल शम्सी यांनी हा एक ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला कोणत्याही संघटनेच्या सांगण्यावरून नसून, वैयक्तिक पातळीवर प्रेरित असल्याचे दिसत आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

इस्रायलच्या तेल अवीव शहरात विमान धडकवण्याचा मुख्य कट अपयशी ठरल्यानंतर, सह-वैमानिकाने थेट विमानाची दोन्ही इंजिने बंद करून सर्व प्रवाशांसह विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला असावा, असा दावा इटालियन वर्तमानपत्राने केला आहे.

‘कोरिअर डेला सेरा’ या इटालियन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ‘फ्लायदुबई’च्या विमानात आपल्या कॅप्टनवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ओमानी सह-वैमानिकाने, आपली मूळ योजना फसल्यानंतर बोईंग ७३७ विमानाचे इंजिन बंद केले असावे. त्याने इंजिनमधील इंधनाचे दोन स्विचेस ‘रन’ स्थितीवरून ‘कटऑफ’ स्थितीवर नेले होते का, याची तपासणी तपास अधिकारी करत असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. तपास यंत्रणा सध्या सह-वैमानिकाने विमानातील इंधन पुरवठा करणारे ‘फ्यूएल स्विचेस’ (Run ते Cutoff) बंद केले होते का, याचा शोध घेत आहेत.

कॉकपिटमध्ये कुऱ्हाडीने हल्ला आणि थरार

अहवालानुसार, ओमानचा रहिवासी असलेला सह-वैमानिक हम्माम अल-हम्मामी याने आधी मुख्य कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. कॅप्टनला ठार करून विमान थेट तेल अवीवमधील एका उंच इमारतीवर धडकवण्याची त्याची योजना होती. मात्र, कॅप्टन मच्छार यांनी रक्ताने माखलेल्या अवस्थेतही प्रतिकार केला.

कट उधळला जात असल्याचे दिसताच सह-वैमानिकाने विमान वाळवंटात पाडण्याचा प्रयत्न केला. त्याने ऑटो-पायलट सिस्टीम बंद करून विमानाचे नियंत्रण अचानक खाली झुकवले. अवघ्या ३० सेकंदांत विमान १६ हजार फूट खाली आले आणि विमानाचा वेग ताशी ९७० किलोमीटरच्या पुढे गेला. यामुळे विमानाचा शेपटाकडील भाग (टेल रडर) अपघातग्रस्त झाला.

  • प्रवाशांची संख्या : १७४ (बहुतांश इस्रायली नागरिक)
  • विमानाचा प्रकार : बोईंग ७३७ (फ्लायदुबई)
  • आपत्कालीन लँडिंग : तबुक विमानतळ, सौदी अरेबिया
  • मुख्य कॅप्टन : स्मित मच्छार (भारतीय नागरिक)

प्रवाशांचे धैर्य अन् दोन वैमानिकांचे प्रसंगावधान

कॉकपिटमधून येणाऱ्या आवाजामुळे एका महिला प्रवाशाने सतर्कता दाखवत इतर प्रवाशांना आणि विमानात प्रवास करणाऱ्या सुट्टीवरील दोन वैमानिकांना माहिती दिली. प्रवाशांनी कॉकपिटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा कॅप्टन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

याच वेळी यानिव हायून नावाच्या एका प्रवाशाने धैर्याने विमानाची कंट्रोल स्टिक मागे ओढून विमान अधिक खाली जाण्यापासून रोखले. त्यानंतर दोन्ही ऑफ-ड्युटी वैमानिकांनी कॉकपिटचा ताबा घेतला, बंद पडलेली इंजिने पुन्हा सुरू केली आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग सौदी अरेबियातील ‘तबुक’ विमानतळावर केले.

वैयक्तिक कृत्य की आंतरराष्ट्रीय कट?

या संपूर्ण प्रकरणाचा तपास संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या नेतृत्वाखाली सुरू असून, यूएईचे ॲटर्नी जनरल हमद सैफ अल शम्सी यांनी हा एक ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला कोणत्याही संघटनेच्या सांगण्यावरून नसून, वैयक्तिक पातळीवर प्रेरित असल्याचे दिसत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेमागे इराणचा हात असण्याच्या शक्यतेवर भाष्य केले होते. मात्र, वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी इराणचा थेट सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कॅप्टन स्मित मच्छार यांची आपबिती

हल्ल्यात गंभीर जखमी झालेले भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सध्या अबु धाबी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयातील त्यांच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ शेअर केला आहे.

“माझा स्वतःचा जीव धोक्यात होता, पण विमानात बसलेल्या १७४ निष्पाप प्रवाशांना मी मरू देऊ शकत नव्हतो. दरवाजा उघडून प्रवासी आणि क्रू मेंबर्स मदतीला येईपर्यंत मी संघर्ष करत राहिलो.”
— कॅप्टन स्मित मच्छार

या घटनेनंतर इस्रायलने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले असून, ओमानच्या वैमानिकाला तेल अवीवसाठी विमान उडवण्याची परवानगी कशी मिळाली, याचा सखोल तपास सुरू केला आहे.