३० सप्टेंबर रोजी ‘फ्लायदुबई’ कंपनीचे विमान सकाळी ७:०५ वाजता १७४ प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांसह दुबईहून उड्डाण करत होते. या विमानाचे मुख्य पायलट भारतीय नागरिक कॅप्टन स्मित मच्छार हे होते, तर त्यांच्यासोबत ओमानचा नागरिक असलेला सह-वैमानिकही कार्यरत होता. विमान जॉर्डन आणि सौदी अरेबियाच्या सीमेजवळ पोहोचले असता, ओमानच्या सह-वैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या माहितीनुसार, सह-वैमानिकाचा हेतू विमान हायजॅक करण्याचा आणि पाडण्याचा होता.
NIA तपासाचे आदेश का?
भारतीय वैमानिकावर झालेला हा हल्ला आणि विमान अपहरणाचा प्रयत्न ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे परिणाम होऊ शकतात. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या घटनेवरून ‘अँटी-हायजॅकिंग ॲक्ट २०१६’ आणि ‘यूएपीए’ (UAPA) अंतर्गत गुन्हे निष्पन्न होत आहेत. या हल्ल्यामागे एखादे मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान किंवा दहशतवादी कट होता का, याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला (NIA) या प्रकरणाची सूत्रे हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
‘फ्लायदुबई’च्या विमानात कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी एनआयएने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भातील वृत्त ‘PTI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
प्रवाशांचे धैर्य आणि सुखरूप लँडिंग
अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर विमानात भीतीचे वातावरण पसरले. मात्र, प्रवासी आणि कॅबिन क्रूच्या सदस्यांनी तत्परता दाखवत हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-वैमानिकाला जागीच पकडले आणि बांधून ठेवले. या हल्ल्यात कॅप्टन स्मित मच्छार यांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
दरम्यान, सुदैवाने याच विमानात फ्लायदुबईचे इतर काही पायलटही प्रवास करत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ कॉकपिटचे नियंत्रण हातात घेतले. अचानक खाली आलेले विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत वळवून वायव्य सौदीतील तबूक येथील ‘प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीज’ विमानतळावर सकाळी १०:४५ वाजता सुरक्षित उतरवले. लँडिंगनंतर सौदी प्रशासनाने आरोपी सह-वैमानिकाला तात्काळ ताब्यात घेतले. केंद्र सरकारने आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) एफआयआर (FIR) नोंदवून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
