एका व्यावसायिक प्लंबरने थेट विमानाचे नियंत्रण हातात घेऊन शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवल्याची थरारक घटना समोर आली आहे. सहवैमानिकानेच केलेल्या हल्ल्यादरम्यान भारतीय कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाल्यानंतर, या प्रवाशाने तातडीने कॉकपिटचा ताबा घेतला आणि विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले. विशेष म्हणजे, हे कठीण काम त्याने कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाविना, फक्त एका टीव्ही शोमधून शिकलेल्या ज्ञानाच्या जोरावर केले.
सहवैमानिकाचा हल्ला अन् भारतीय कॅप्टनचे धाडस
‘फ्लायदुबई’ कंपनीच्या विमानात ही धक्कादायक घटना घडली. विमानातील सहवैमानिकानेच अचानक मुख्य कॅप्टनवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यानंतरही भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी प्रचंड प्रसंगावधान दाखवले. प्रवाशांचे प्राण धोक्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून कॉकपिटचा सुरक्षा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक मारली.
‘तो’ मदतीला धावला आणि विमानाची कमान सांभाळली
कॉकपिटचा दरवाजा उघडताच विमानात प्रवासासाठी बसलेला यानिव हावुन (Yaniv Hayun) हा इस्रायली नागरिक तातडीने मदतीला धावला. यानिव पेशाने एक प्लंबर आहे. वैमानिक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आणि विमान अनियंत्रित होण्याचा धोका निर्माण झाला असताना, यानिवने न घाबरता थेट विमानाचे कंट्रोल पॅनेल आणि फ्लाईट कंट्रोल्स आपल्या हातात घेतले. अत्यंत बिकट आणि ताणतणावाच्या परिस्थितीत त्याने विमानावरील नियंत्रण मिळवले आणि ते सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवले.
‘क्रॅश इन्व्हेस्टिगेशन’ शो ठरला जीवनदायी
या अभूतपूर्व आणि धाडसी कामगिरीनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः यानिव हावुन यांची भेट घेतली. “विमान चालवण्याचे किंवा लँड करण्याचे कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण नसताना तू हे कसे साध्य केलेस?” असा सवाल पंतप्रधान नेतन्याहू यांनी विचारला.
त्यावर उत्तर देताना यानिवने सांगितले, “मी दूरदर्शनवर ‘क्रॅश इन्व्हेस्टिगेशन’ हा माहितीपट आणि टीव्ही शो नियमितपणे पाहतो. त्या शोमधील विविध विमान अपघातांचे विश्लेषण आणि कॉकपिटमधील प्रक्रिया पाहून मला विमानाच्या आपत्कालीन नियंत्रणाची मूलभूत माहिती मिळाली होती. त्याच ज्ञानाचा वापर मी त्या क्षणी केला.”
यानिवच्या या अतुलनीय धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे जगभरातून कौतुक होत असून, एका माहितीपटातील ज्ञान शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कामी आल्याची ही बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
