scorecardresearch

Budget 2019: निर्मला सीतारामन यांची बजेट ब्रीफकेसऐवजी लाल कापडाला पसंती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ब्रीफकेस परंपरेला छेद देत लाल कापडात अर्थसंकल्प आणला आहे

Budget 2019: निर्मला सीतारामन यांची बजेट ब्रीफकेसऐवजी लाल कापडाला पसंती

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या आज मोदी सरकार 2 चा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या काहीवेळापूर्वीच संसद भवनात दाखल झाल्या. त्यांच्या हाती बजेट ब्रीफकेस असेल असे वाटले होते. मात्र त्याऐवजी त्यांच्या हाती लाल रंगाच्या कापडात ठेवलेले बजेट पाहण्यास मिळाले. या लाल कापडावर भारतीय राजमुद्राही आहे.  बजेट सादर करण्यासासाठी आत्तापर्यंत जेव्हा अर्थमंत्री संसदेत यायचे तेव्हा त्यांच्या हाती ब्रीफकेस असायची. त्या ब्रीफकेसमध्ये काय असेल याची चर्चा व्हायची. मात्र निर्मला सीतारामन या जेव्हा संसद भवनात आल्या तेव्हा त्यांच्या हाती लाल रंगाच्या कापडात ठेवलेले बजेट पाहण्यास मिळाले. या कापडाच्या मध्यभागी भारतीय राजमुद्रा आहे.

अशा प्रकारे अर्थसंकल्प किंवा हिशोबाचे कागद ठेवणं ही भारतीय परंपरा आहे. आत्तापर्यंत आपण पाश्चिमात्यांचे जे अनुकरण करत होतो त्यापासून मुक्ती मिळाल्याचं हे द्योतक आहे असंही मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्मला सीतारामन या बजेट हा शब्द बदलून ‘बही खाता’ असे नाव त्याला देण्याच्या तयारीत आहेत असेही समजते आहे. जर नाव बदलण्यात आले तर ते नावही निर्मला सीतारामन त्यांच्या भाषणात जाहीर करणार आहेत.

 

ब्रीफकेसचा इतिहास

संसदेत बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून आहे. या बजेटमध्ये ब्रीफकेसला खूप महत्त्व आहे. १७३३ मध्ये ब्रिटिश सरकाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोल संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या हातात एक चामडी बॅग होती. या चामडी बॅगेला फ्रेंच भाषेत बुजेट म्हटले जाते. कालांतराने हे नाव बजेट असे झाले. ब्रीफकेसमध्ये बजेट म्हणजेच अर्थसंकल्प घेऊन यायचा ही ब्रिटशांचीच परंपरा आहे.

आत्तापर्यंत येणारे अर्थमंत्री हे ब्रीफकेस घेऊनच संसदेत पोहचत असत. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या परंपरेला छेद देत लाल कापडात ठेवलेला अर्थसंकल्प आणला आहे. या लाल कापडाच्या मध्यभागी भारतीय राजमुद्रा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-07-2019 at 10:31 IST

संबंधित बातम्या