पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पाच प्रमुख जागतिक प्राधान्यक्रम अधोरेखित केले. यामध्ये कुशल कर्मचारी वर्ग, सर्वोत्तम पद्धतींचे दस्तऐवजीकरण, जागतिक डिजिटल संग्रह आणि नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना पूर्वसूचना प्रणाली आणि समन्वय राखणे हा महत्त्वाचा पैलू असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
भारताने २९ देशांना फायदा देणारी त्सुनामी-इशारा प्रणाली स्थापित केली असल्याची माहिती देतानाच लहान बेट असलेल्या विकसनशील देशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. युरोपमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाबद्दल मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांचे आभार मानले आणि आगामी संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
संबोधनादरम्यान पंतप्रधानांनी नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलासाठी किनारी क्षेत्रे आणि बेटांची असुरक्षितता अधोरेखित केली. यावेळी त्यांनी भारत आणि बांगलादेशसह अन्य देशांतील चक्रीवादळांसारख्या आपत्तींचा दाखलाही दिला.
आपत्तीच्या प्रतिकारशक्तीसाठी वित्तपुरवठा आवश्यक असल्याचे सांगतानाच विकसनशील देशांना आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी कृतिशील कार्यक्रमांचे आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केले. तसेच पूर्वसूचना प्रणाली आणि समन्वय मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली.