करोना रुग्णसंख्या कमी होत असताना ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. करोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातील चिंता वाढली आहे, त्यामुळे बूस्टर डोसची घाई करणे योग्य नाही. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता पहिल्यांदा संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रॉडेरिको ऑफ्रिन यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकारामुळे देशाने इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोकसंख्येला बूस्टर डोस देण्यास सुरुवात करावी का, असं विचारलं असता  डॉ. ऑफ्रिन म्हणाले की, “संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करून संसर्गाचा प्रसार कमी करण्याचा भारताचा दृष्टीकोन योग्य आहे.”  तसेच ओमायक्रॉन या वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटवर कोणत्या लसी अधिक प्रभावी आहेत, याबद्दल स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले. ते इंडिया टुडेशी बोलत होते. दरम्यान, “ओमायक्रॉनने चिंता वाढवली असताना लसीकरण न केलेल्या लोकसंख्येचं प्रथम लसीकरण करण्याऐवजी बूस्टर डोसची घाई करणे योग्य नाही,” असंही डॉ. ऑफ्रिन म्हणाले.

देशभरात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.

हेही वाचा – ओमायक्रॉनचे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात आहेत किती रुग्ण