scorecardresearch

Lalu Prasad Yadav Fodder Scam: चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा; सीबीआय कोर्टाचा निर्णय

Fodder Scam : १५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते.

Fodder scam Lalu prasad Yadav sentenced to five years in jail by CBI court

Lalu Prasad Yadav Fodder Scam Case : डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी बेकायदेशीरपणे काढल्याच्या चारा घोटाळ्याप्रकरणी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची सीबीआय कोर्टचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली. लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावण्यात येत आहे.

१५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर लालू प्रसाद यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. लालू प्रसाद यांना उपचारांसाठी तुरुंग प्रशासनाने रिम्समध्ये पाठवले होते. लालू प्रसाद हे रिम्स मधूनच कोर्टात उपस्थित होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी सीबीआयने सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. बचाव पक्षाने किमान शिक्षेचा आग्रह धरला. रांची न्यायालय परिसरात बिहारमधूनही मोठ्या संख्येने आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पोहोचले होते.

१५ फेब्रुवारी रोजी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरलेल्या ३६ जणांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ याशिवाय कट रचण्याशी संबंधित कलम १२० ब आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले.

काय आहे प्रकरण?

चारा घोटाळ्याचे हे प्रकरण सुमारे २३ वर्षे जुने आहे. १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडमधील डोरंडा येथील कोशागारामधून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले. या प्रकरणी सीबीआयने २९ जानेवारी रोजी विशेष न्यायालयात युक्तिवाद पूर्ण केला होता.

यापूर्वी लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली होती. ही प्रकरणे दुमका, देवघर आणि चाईबासा कोषागारातून पैसे काढण्याशी संबंधित होती. त्याच वेळी, आता लालू प्रसाद यांना डोरंडा ट्रेझरी प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2022 at 14:19 IST

संबंधित बातम्या