FIFA World Cup France vs England match : इंग्लंडने शनिवारी रात्री हार्ड रॉक स्टेडियमवर झालेल्या एका अत्यंत चुरशीच्या आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात ६-४ असा विजय मिळवून विश्वचषकातील तिसरे स्थान पटकावले. या सामन्यात फ्रान्सच्या एमबाप्पेने विश्वचषक इतिहासात सर्वाधिक २२ गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर करत फुटबॉल जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, बुकायो साकाच्या उत्कृष्ट हॅटट्रिक आणि ज्युड बेलिंगहॅमच्या अखेरच्या क्षणांतील अप्रतिम खेळाच्या जोरावर इंग्लंडने कांस्यपदक जिंकले.
कर्णधाराने एकहाती झुंज दिली
हॅरी केन आणि ज्युड बेलिंगहॅमसारखे दिग्गज सुरुवातीला राखीव खेळाडूंच्या बाकावर बसलेले होते. इंग्लंडच्या संघाने सुरुवातीलाच फ्रेंच संरक्षणात्मक फळी भेदत ४-० अशी भक्कम आघाडी घेतली. स्पेनविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवातून फ्रान्सचा संघ अजून सावरला नव्हता आणि ते पूर्णपणे बॅकफूटवर गेले होते. पण त्यांच्या कर्णधाराने एकहाती झुंज देत संघाला पुन्हा सामन्यात आणले.
एमबाप्पेने ४८ व्या मिनिटाला थ्री लायन्सचा (इंग्लंड) गोलरक्षक डीन हेंडरसनला हुलकावणी देत पहिला गोल केला. त्यानंतर ६६ व्या मिनिटाला, २७ वर्षीय सुपरस्टार एमबाप्पेने एक ऐतिहासिक क्षण साकारला. डी बॉक्सच्या आत चेंडूवर ताबा मिळवत, त्याने १४ यार्डांवरून डाव्या पायाने एक जोरदार फटका मारला आणि हेंडरसनला पुन्हा एकदा चकवले. या गोलसह त्याची या स्पर्धेतील गोलसंख्या १० वर पोहोचली, जी गोल्डन बूटच्या शर्यतीत लिओनेल मेस्सीपेक्षा दोनने जास्त होती.
एमबाप्पेचा विश्वविक्रम
सर्वात महत्वाचं म्हणजे, हा त्याच्या कारकिर्दीतील २२ वा विश्वचषक गोल ठरला आणि त्याने मेस्सीचा २१ गोलांचा आधीचा सार्वकालिक विक्रम मोडीत काढला. एमबाप्पेच्या या दुसऱ्या गोलमुळे ‘लेस ब्ल्यूज’ने (फ्रेंच संघ) जोरदार पुनरागमन केलं आणि सामन्यातील फरक ४-३ असा कमी केला. परंतु, इंग्लंडने लगेचच आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं. बुकायो साकाने एकापाठोपाठ एक गोल करत आपली उत्कृष्ट हॅटट्रिक पूर्ण केली आणि या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला आघाडीवर ठेवलं.
फ्रान्सने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि डेम्बेलेने केलेल्या गोलच्या जोरावर सामना ५-४ अशा रोमांचक स्थितीत आणला. ते सामना बरोबरीत सोडवण्याच्या अगदी जवळ होते. पण सामन्याच्या अतिरिक्त वेळेत, राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या ज्युड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रिअल माद्रिदच्या या मिडफिल्डरने फ्रान्सच्या अनेक बचावपटूंना चकवून एक उत्कृष्ट सोलो रन केला आणि चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवून इंग्लंडला ६-४ असा अविश्वसनीय विजय मिळवून दिला. अशा प्रकारे इंग्लंडने आपल्या मोहिमेचा शेवट दिमाखात साजरा केला, तर एमबापेला एका ऐतिहासिक विक्रमानंतरही पराभवाचा सामना करावा लागला.
