कठुआ आणि उन्नाव या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेसंदर्भात सर्व स्तरातून प्रतिक्रिया आल्या. अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध नोंदवला. यावर आता शबाना आझमी यांची प्रतिक्रिया आली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेचा संदर्भ घेऊन शबाना आझमी यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहिम चांगली आहे, मात्र या मोहिमेसाठी मुली जिवंत राहिल्या पाहिजेत असे शबाना आझमी यांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीर या ठिकाणी असलेल्या कठुआत एका ८ वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष बलात्कार करण्यात आला. तसेच त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे सगळा देश हादरला. अशात आता शबाना आझमी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. शशी रंजन यांनी एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यात शबाना आझमी यांनी ही भूमिका मांडली आहे. या कार्यक्रमात जितेंद्र, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, अनुप जलोटा आणि अमृता फडणवीस यांनीही हजेरी लावली होती.

आपल्या देशात एकाच वेळी १८ व्या, १९ व्या शतकात अजूनही जगणारी माणसे आहेत. स्त्रियांना त्या काळात दिली जाणारी वागणूक आजच्या काळातही दिली जाते आहे. स्त्रियांचा आदर न करणारी माणसे समाजात आहेत. एकीकडे स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे, तर दुसरीकडे चिमुरड्या मुलीही सुरक्षित नाहीत हा विकृत मानसिकतेचा कळस आहे अशे शबाना आझमी यांनी म्हटले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओच्या घोषणा कायम केल्या जातात. मात्र आपल्या मुली जिवंत कशा राहतील हे पाहणे आपली जबाबदारी आहे असे शबाना आझमी यांनी म्हटले आहे.