बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील हरनागर गावात जमिनीवरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना जिवंत जाळण्यात आले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी कटिहार येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आठ संशयित पसार झाले आहेत. घटनेवेळी घरातील सर्व सदस्य झोपलेले होते. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

घटनेनंतर कटिहारचे पोलीस अधिक्षक विकास कुमार यांनी गावातच मुक्काम केला आहे. कटिहारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे अत्यंत नीच कृत्य असल्याचे सांगत दोषींवर दया दाखवण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. जखमी पती-पत्नींना उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. हरनागर गावात पंचम दास आणि मंजुळा देवी सरकारी जमिनीवर गेल्या एक वर्षांपासून राहतात आणि चहाचे दुकान चालवतात. या दुकानावरच त्यांचा चरितार्थ चालत असत.

मंजुळा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जमिनीवर मुज्लिम नावाच्या एका व्यक्तीची नजर होती. मुज्लिमने अनेकवेळा तिच्या पतीला जमीन सोडण्यास सांगितले होते. संशयित मुज्लिमनने गेल्या रविवारीही जमीन सोडण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी रात्री १२ नंतर मुज्लिमने त्यांच्या घरावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. यामध्ये त्यांचे दोन मुलं प्रिती (वय ८) आणि किरण (वय १२) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.