Karnataka Satish Patri Tantrik Arrest: महाराष्ट्रसह अनेक राज्यांत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यात आला आहे. सामान्य लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक लोक त्यांची लुबाडणूक आणि छळ करत असतात. कर्नाटक पोलिसांनी नुकतेच एका स्वयंघोषित मांत्रिकाला अटक केली आहे. या मांत्रिकाने भूत उतरविण्याचे कारण सांगत एका पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला, असा आरोप करण्यात येत आहे. सतीश पात्री नामक हा आरोपी महिनाभर पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद केले. पोलीस दलातील एक हवालदार त्याला मदत करत असल्याची बाबही समोर आली आहे.
कर्नाटकच्या चिक्कमंगलुरू आणि आसपासच्या परिसरात काळी जादू करणारा मांत्रिक म्हणून सतीश पात्रीची ओळख होती. बंगळुरुच्या जेपी नगर परिसरातून सतीश पात्रीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे, द इंडियन एक्सप्रेसने या संबंधीची बातमी दिली आहे.
चिक्कमंगलुरू जिल्हा पोलिसांनी पात्रीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि कर्नाटक अमानवीय दुष्प्रथा व काळी जादू प्रतिबंध आणि निर्मूलन कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत.
पहिला गुन्हा कोणता?
२३ ऑगस्ट रोजी पात्रीच्या विरोधात पहिली तक्रार दाखल झाली होती. मंदिरातील मुख्य पुजारी असलेल्या पात्रीने पाच वर्षांपासून अनेक भक्तांकडून पैसे उकळले होते. ज्यात प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. महिलांनी त्याचे म्हणणे ऐकावे आणि तो बोलवेल तेव्हा हजर राहावे, यासाठी तो त्यांना काळ्या जादूची धमकी देत असे.

पात्रीच्या या छळवणुकीबाबत गावातील स्थानिक ग्रामस्थ नाईक यांनी जाब विचारला असता पात्रीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर पात्रीला जामीन देण्यात आला होता. दरम्यान पात्रीने महिलांचे शोषण करतानाचे, पैसे उकळतानाचे आणि एका लहान मुलीला कोबंडीचे रक्त पाजण्यास भाग पाडल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली.
बलात्काराची दुसरी तक्रार दाखल
पात्रीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हसन जिल्ह्यातील एका महिलेने ३ सप्टेंबर रोजी तिच्यावर २०२३ पासून एका मंदिराच्या आवारात वारंवार बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. आपल्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे या महिलेने तक्रारीत नमूद केले.
पात्रीला मदत करणारा हवालदार निलंबित
पहिल्या गुन्ह्यात मिळालेला जामीन न्यायालयाने रद्द केल्यानंतर पात्री अटक टाळण्यासाठी भूमिगत झाला होता. त्याने स्वतःचा मोबाइल आणि सिम कार्ड बदलले. ओळखीच्या लोकांशी बोलण्यासाठी तो इंटरनेट आणि कॉन्फरन्स कॉलचा वापर करत होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली होती.
कांतेश नावाचा एक हवालदार त्याला पोलिसांच्या हालचालीची माहिती देत असल्याची बाब तपासात उघड झाल्यानंतर या हवालदाराला निलंबित करून त्याच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे. दरम्यान पात्रीला अटक झाल्यामुळे आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
