जबरदस्तीने धर्मपरिवर्तन हे भारतासारख्या राष्ट्रात कोणत्याही धर्माच्या प्रसाराचे उपाय असू शकत नाही. तसेच या देशात आस्तिक आणि नास्तिक दोघेही समान हक्कांसह अस्तित्वात आहेत, असे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी सांगितले. देशाच्या विविध भागातील ख्रिश्चन समाजातील प्रमुख लोकांशी नकवी यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भारत कधीही धार्मिक कट्टरता आणि असहिष्णुतेला बळी पडू शकत नाही कारण हे जगातील सर्वात मोठे आध्यात्मिक-धार्मिक ज्ञानाचे केंद्र आहे. आणि सर्व धर्म सम भाव तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) या संकल्पनेचा प्रेरणास्त्रोत आहे.”

“भारतात एकीकडे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारशी, ज्यू, बहाई आणि जगातील इतर विविध धर्मांना माननारे लोक राहतात. तर दुसरीकडे देशात कोट्यवधी नास्तिक देखील आहेत आणि या सर्वांना समान घटनात्मक आणि सामाजिक अधिकार आहेत. त्यामुळे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणं हे कोणत्याही देशात कोणत्याही धर्माच्या प्रसाराचे माप असू शकत नाही. भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे विविध धर्मांचे सण आणि इतर आनंदी प्रसंग एकत्र साजरे केले जातात. आपण हा सांस्कृतिक वारसा मजबूत ठेवण्याची गरज आहे. एकता आणि सौहार्दाच्या या रचनेला अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न भारताच्या आत्म्याला दुखावेल,” असे नकवी म्हणाले.

जगातील जवळजवळ सर्व धर्मांचे अनुयायी भारतात राहतात. त्यांच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हक्कांची घटनात्मक सुरक्षा आणि सामाजिक हमी हे विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशाच्या सामर्थ्याचे सौंदर्य आहे. भारताची सहिष्ण संस्कृती आणि सह-अस्तित्वाची बांधिलकी कोणत्याही परिस्थितीत कमकुवत होऊ दिली जाणार नाही याची खात्री करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे नकवी म्हणाले.