नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र विभाग हा पूर्णपणे बदलला असून, उद्धट झाला आहे, असे एका युरोपीयन अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी  लंडनमध्ये केला. त्याला प्रत्युत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले, की होय भारतीय परराष्ट्र विभाग बदललाच आहे. या बदललेल्या धोरणाला उद्धटपणा म्हणत नाही तर राष्ट्रहिताचे रक्षण करणे, असे म्हणतात.

भारतीय परराष्ट्र विभाग  उद्धट झाला असल्याने संवाद होऊच शकत नाही, असा दावा अधिकाऱ्याने केल्याचे राहुल म्हणाले होते. याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या ‘ट्विट’मध्ये जयशंकर म्हणाले, की  यातून भारतीय परराष्ट्र विभागाचा आत्मविश्वास प्रतिबिंबित होतो. होय, परराष्ट्र विभाग बदलला आहे. होय, आम्ही सरकारचे आदेश पाळतो. आम्ही परराष्ट्रांच्या युक्तिवाद, शेरेबाजीला जशास तसे प्रत्युत्तर देतो. याला उद्धटपणा म्हणत नाहीत तर याला आत्मविश्वास म्हणतात. अन् याला राष्ट्रहिताचे रक्षण करणे, असेही म्हणतात.