अमेरिकेच्या विधी विभागाने प्रसिद्ध केलेल्या एप्स्टाइन फाइलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. पंतप्रधानांचा हा उल्लेख म्हणजे ‘एका दोषी सिद्ध झालेल्या गुन्हेगाराची निरर्थक बडबड,’ अशा शब्दांमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने त्याचे वर्णन केले आहे. या आरोपांकडे संपूर्ण तुच्छतेने पाहणेच योग्य ठरेल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी हे आपल्या सांगण्यावरून इस्रायलला गेले आणि त्यांनी तिथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काम केले, असे जेफ्री एप्स्टाइनने म्हटल्याचे या कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे. ‘‘यापैकी पंतप्रधानांचा जुलै २०१७मधील अधिकृत इस्रायल दौरा इतकाच उल्लेख तथ्याला धरून आहे,’’ असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या विधी विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या फायलींमध्ये ३५ लाख पाने आणि दोन हजार ध्वनिफितींचा समावेश आहे. त्यामध्ये चित्रपट निर्मात्या आणि न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्या आई मीरा नायर यांच्यासह अनेक बड्या नावांचा समावेश आहे.  

भाजपची काँग्रेसवर टीका

एपस्टाइन फाइलमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उल्लेखाबद्दल काँग्रेसने आपल्या समाजमाध्यमांवरील खात्यांवर केलेल्या टिप्पणीवर भाजपने टीका केली आहे. ‘‘एका सामान्य ई-मेलचा वापर करून काँग्रेस चुकीची माहिती परवत आहे,’’ असे भाजपने म्हटले आहे. पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसची पोस्ट ही ‘फेक न्यूज’ असल्याचे ‘एक्स’वर म्हटले आहे. एप्स्टाइन फाइलमधील मोदींच्या उल्लेखाबद्दल शून्य पुरावा आहे, असे मालवीय यांनी नमूद केले आहे.