इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथे शिकणाऱ्या एका परदेशी विद्यार्थ्यीनीने इथल्या एका प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थीनीने याची तक्रार थेट तिच्या देशाच्या भारतातल्या दुतावासाकडे केली आहे. दुतावासाने ही तक्रार आयआयटी प्रशासनाकडे वर्ग केली असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थीनी या संस्थेत इतर देशांच्या स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

यासंदर्भात आयआयटी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यासंदर्भातील तक्रार आम्हाला मिळाली असून याची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. हे प्रकरण कायद्याच्या चौकटीत असल्याने या अधिकाऱ्याने पीडित विद्यार्थ्यीनीचे नाव, तिचा देश आणि इतर माहिती देण्यास नकार दिले आहे. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार अभियांत्रिकी विभागातील एका वरिष्ठ प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली ही विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे. दरम्यान, या प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याने गेल्या काही दिवसांपासून पीडित विद्यार्थीनी अस्वस्थ होती.

दरम्यान, या विद्यार्थीनीने रविवारी विमेन्स सेलकडे तक्रार केली होती. मात्र, या सेलच्या प्रशासनाने तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही की ही तक्रार पुढेही पाठवली नाही. त्यानंतर या विद्यार्थीनीने थेट भारतातील आपल्या देशाच्या दुतावासाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर दुतावासाने आयआयटीच्या प्रशासनाशी संपर्क साधून या तक्रारीबाबत चौकशीची विनंती केली.

दरम्यान, आयआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विनयभंगांच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कारवाईच्या नियमावलीनुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संस्थेच्या प्रतिष्ठेचे नुकसान झाले असून या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधीत प्राध्यापकावर संस्थेकडून कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.