Ines Faria alleged harassment in Mumbai: मुंबईत एका परदेशी तरुणीला काही तरुणांकडून झालेल्या त्रासाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित तरुणीने हा अनुभव तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. भारतात दोन महिन्यांपासून वास्तव्य करत असताना असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे तिने म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवरील पोस्टनुसार, या तरुणीचे नाव इनेस फारिया (Ines Faria) असून ही घटना मुंबईत घडली. व्हिडिओमध्ये दोन तरुण तिचा आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींचा पाठलाग करताना दिसत आहेत. ते वारंवार सेल्फी काढण्याची मागणी करत होते. संबंधित तरुणीने अनेकदा नकार दिल्यानंतरही ते ऐकण्यास तयार नव्हते, असे व्हिडिओतून दिसते.

इनेस फारियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी अनेक वेळा ‘नाही’ म्हटल्यानंतरही ते आमचा सुमारे १५ मिनिटांहून अधिक काळ पाठलाग करत राहिले. ते सतत फोटोसाठी आग्रह करत होते. मला अस्वस्थ वाटत होते. काही वेळा त्यांच्या वागण्यामुळे मला रस्त्यावर नीट चालताही येत नव्हते.” परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जाणवल्यानंतर तिने मोबाईलवर या घटनेचे चित्रीकरण केले.

“‘नाही’ हे पूर्ण वाक्य आहे”

तिने पुढे स्पष्ट केले की, भारतातील तिचा बहुतांश प्रवास सुखद आणि स्वागतार्ह होता. मात्र हा अनुभव अत्यंत धक्कादायक होता. “फक्त ही एक आठवण वाईट होती. ‘नाही’ हे पूर्ण वाक्य आहे. तुमची सुरक्षितता आणि आराम नेहमीच प्रथम येतो,” असे म्हणत तिने संमती आणि वैयक्तिक सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून महिला सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून या घटनेची दखल घेतली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय घडले?

इनेस फारिया यांच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, मुंबईतील तरुणांचा एक गट तिचा आणि तिच्या सोबत असलेल्या लोकांचा पाठलाग करत होता. तिने नकार देऊनही ते वारंवार फोटोची मागणी करत राहिले. ती म्हणाली, “मी अनेक वेळा ‘नाही’ म्हटल्यानंतरही ते आमचा पाठलाग करत राहिले आणि फोटो मागत राहिले. मला अस्वस्थ वाटत असल्यामुळे मी अनेकदा नकार दिला, पण ते खूप आग्रही होते. ते ऐकतच नव्हते. ते तरुण १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ आमचा पाठलाग करत राहिले आणि नंतर फोटोसाठी जबरदस्ती करू लागले. काही वेळा त्यांच्या वागण्यामुळे मला रस्त्यावर नीट चालताही येत नव्हते, त्यामुळे मी त्यांना माझ्यापासून दूरही ढकलले.”