Former PM Manmohan Singh Dies: भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणाऱ्या काही घटना स्वातंत्र्योत्तर काळात घडल्या. त्यामध्ये इंदिरा गांधींनी १९६९ साली केलेल्या बँकांच्या राष्ट्रीयीकरण होतं, त्याचप्रमाणे १९९१ साली तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशानं स्वीकारलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांचाही समावेश होतो. त्या धोरणानं देशाला थेट जागतिक बाजारपेठेत प्रबळ दावेदार म्हणून नेऊन ठेवणारे भारताच्या अर्थक्रांतीचे दूत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं. ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण देशाच्या आर्थिक इतिहासावर उमटलेल्या त्यांच्या पाऊलखुणा कधीही पुसल्या न जाणाऱ्या आहेत!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमोहन सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या आणि तितक्याच तणाव असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. केंब्रिजमधलं शिक्षण, ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रातली डी.फिल पदवी आणि पुन्हा केंब्रिजमध्ये पीएचडी.. मनमोहन सिंग यांच्या ज्ञानकक्षा देशाला जागतिक स्तरावर कशा घेऊन गेल्या, याची मुळं त्यांचं स्वातंत्र्योत्तर काळातल्या पाकिस्तानातलं बालपण, त्यांचं शिक्षण आणि भारताच्या उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठीचा त्यांचा दृष्टीकोन यात आढळून येतात. भारतात अर्थ खात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागारपासून ते थेट देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंत त्यांनी सर्व जबाबदाऱ्या तितक्याच मितभाषी आणि मृदू स्वभावानिशी पार पाडल्या.

Video: आपल्या शेवटच्या अधिवेशनात व्हीलचेअरवरून आले होते मनमोहन सिंग, पंतप्रधान मोदींनीही काढले होते गौरवोद्गार!

मनमोहन सिंग यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद, खूप दु:ख किंवा खूप तणाव असं कुणी फारसं पाहिलंही नसावं कदाचित. कोणत्याही स्थितीत त्यांच्यातला स्थिर अढळपणाच त्यातून दृग्गोचर होत होता. पण आयुष्यात इतक्या मोठमोठ्या पदांवर काम केलं असलं, देशाचं नेतृत्व केलं असलं, देशाच्या आर्थिक विकासाचा नव्याने पाया रचला असला, तरी या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मनमोहन सिंग यांना आणखी एका गोष्टीचा होता! इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील ‘त्या’ सर्वात आनंदाच्या काळाबाबत मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं होतं.

“तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता”!

मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ व अमृतसरच्या हिंदू कॉलेजमधला काळ हा आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता, असं सांगितलं होतं. १९५२ साली डॉ. मनमोहन सिंग हे पंजाब विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात रुजू झाले होते. तेव्हा डॉ. एस. बी. रांगणेकर यांच्यासारख्या विद्वानामुळे आपण प्रेरित झाल्याचं ते म्हणाले. त्यांच्यामुळेच केंब्रिज विद्यापीठात पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्याचंही मनमोहन सिंग यांनी आवर्जून नमूद केलं होतं. १९५७ साली ते पुन्हा वरीष्ठ प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. १९६६ सालापर्यंत त्यांनी पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं. वयाच्या ३३ व्या वर्षीच पूर्णवेळ प्राध्यापक होणारे त्या काळात ते एकमेवच होते!

मनमोहन सिंग यांचा पंजाब विद्यापीठातील जुना फोटो (फोटो सौजन्य – पंजाब विद्यापीठ अर्काईव्ह)

डॉ. रांगणेकरांबाबत मनमोहन सिंग यांनी २०१८ साली पंजाब विद्यापीठाला दिलेल्या भेटीवेळी आठवण सांगितली होती. “डॉ. रांगणेकर आणि त्यांच्या पत्नी शालिनी या मला त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग मानत होते. तो माझ्या आयुष्यातला सर्वाच आनंदाचा काळ होता”, असं त्यांनी नमूद केलं होतं. त्यावेळी मनमोहन सिंग यांचे विद्यार्थी राहिलेले आणि सध्या अर्थविषयक तज्त्र म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक एच. एस. शेरगिल यांनीही प्राध्यापक मनमोहन सिंग कसे होते याबाबत भाष्य केलं. “प्रत्येक लेक्चरला डॉ. सिंग पूर्ण तयारीनिशी यायचे. विषयाची स्पष्टता आणि प्रभुत्व या दोन्हींचा विलक्षण मिलाफ त्यांच्याठायी होता. विद्यार्थी म्हणून आमची कधीच त्यांच्या लेक्चरला उशीरा जाण्याची हिंमत झाली नाही”, असं शेरगिल यांनी तेव्हा नमूद केलं.

Dr. Manmohan Singh: ‘समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल’, शेवटच्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग काय म्हणाले होते?

चंदीगडवर कायमच डॉ. मनमोहन सिंग यांचं प्रेम होतं! ते दिल्लीला राहायला आल्यानंतरही चंदीगडची त्यांना विशेष ओढ होती. पंजाब युनिव्हर्सिटीच्या गुरू तेग बहादूर वाचनालयाला डॉ. मनमोहन सिंग यांनी तब्बल ३५०० पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत. २०१८ साली चंदीगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चरनं विद्यापीठाच्या आवारात डॉ. मनमोहन सिंग यांचं पुस्तकांचं कलेक्शन ठेवण्यासाठी एक खास जागाही तयार केली होती.

“मी आज जो काही आहे, तो त्या कॉलेजमुळेच आहे”

दरम्यान, अमृतसरच्या हिंदू कॉलेजला डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीतील यशाचं श्रेय दिलं आहे. १९४८ साली ते हिंदू कॉलेजमधून उत्तीर्ण झाले. त्यानंतर तब्बल ७० वर्षांनी म्हणजे २०१८ साली त्याच कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी याच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांच्याप्रमाणेच डॉ. मनमोहन सिंग यांचाही जन्म सध्याच्या पाकिस्तानमध्येच झाला होता. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये येऊन स्थायिक झालं, तर गुजराल यांचं कुटुंब जलंधरमध्ये स्थायिक झालं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Formar prime minister dr manmohan singh passed away once spoke about happiest period of life pmw