Former Army Chief General MM Naravane’s Memoir Four Stars of Destiny Controversy : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राप्रकरणी वाद निर्माण झालेला असताना याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने या पुस्तकाच्या लीकप्रकरणी बहुराष्ट्रीय चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाकडून अनिवार्य मंजुरी मिळवण्यापूर्वीच हे पुस्तक जागतिक डिजिटल बाजारपेठेत दाखल झाले असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलंय. तर, १३ अंकी ISBN कोडवरून या लीकप्रकरणी तपासणी केली जाणार आहे.
हे पुस्तक अमेरिका, कॅनाडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात मंजुरीपूर्वीच डिजिटली उपलब्ध आहे. पुस्तकाची ही अवैध विक्री कटाचा भाग असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच, पोलिसांनी आता अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये डिजिटल आणि आर्थिक मार्गांचा मागोवा घेत आहेत, जिथे हे पुस्तक मंजुरीपूर्वी ऑनलाइन उपलब्ध असल्याचा आरोप आहे.
आधी हे पुस्तक कुठे उपलब्ध झाले?
तपासातून हेही समोर आलंय की हे पुस्तक उपलब्ध होण्यापूर्वी .io डोमेन एक्सटेंशनवर अपलोड करण्यात आले होते. जे ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरीशी संबंधित देशाचा कोड डोमेन आहे. यानंतरच हे पुस्तक इतर होस्टिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले.
ISBN कोडमुळे लागणार का छडा?
विशेष कक्षाने आता पुस्तकाच्या ISBN नंबरचीही तपासणी सुरू केली आहे. ISBN म्हणजे इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बुक नंबर असतो. हा कोड १३ अंकात असतो, पुस्तकांना हा कोड दिला जातो. लीक झालेल्या आवृत्तीत सापडलेला हा कोड एमएम नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचा असल्याचं मानलं जातंय. या कोडबाबत पेंग्विन इंडियावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
ISBN ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अद्वितीय ओळखपत्र आहे जी पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीला दिली जाते, ज्यामुळे कॅटलॉगिंग, वितरण आणि विक्री सुलभ होते. हार्डबॅक आणि ई-बुक आवृत्त्यांसारख्या वेगवेगळ्या स्वरूपांसाठी स्वतंत्र ISBN जारी केले जातात.
दरम्यान या पुस्तकाच्या प्रकाशनावरून वाद सुरू असतानाच पुस्तकाची प्रकाशन कंपनी पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने निवेदन सादर करत स्पष्टीकरण दिलं. ‘मनोज नरवणे यांच्या पुस्तकाच्या कोणत्याही प्रती छापल्या नाहीत’, असं पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने म्हटलं. पेंग्विन पब्लिकेशन्सच्या या स्पष्टीकरणानंतर आता राहुल गांधींनी पुन्हा या प्रकरणावर मोठं भाष्य केलं. ‘एक तर मनोज नरवणे खोटं बोलत असतील किंवा पुस्तकाची प्रकाशन कंपनी खोटं बोलत असेल’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

