पीटीआय, नवी दिल्ली
माजी लष्करप्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा (नि.) (वय ९६) यांचे शुक्रवारी निधन झाले. लष्कराने ही माहिती दिली. जनरल शर्मा हे ३० जून १९८८ ते ३० जून १९९० या कालावधीत लष्करप्रमुख होते. भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ मध्ये झालेल्या युद्धात लाहोर विभागात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. जनरल शर्मा यांनी चिलखती रेजिमेंटचे नेतृत्व केले आणि लष्करात इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. शर्मा यांच्या निधनाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जनरल धीरज सेठ यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने शोक व्यक्त केला आहे.
जनरल विश्वनाथ शर्मा यांचा लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्म ४ जून १९३० रोजी झाला. शर्मा यांच्यासह त्यांच्या दोन पिढ्यांतील तिघांनी संरक्षण दलामध्ये उच्च पदे भूषविली. स्वतंत्र भारतामध्ये पहिले परमवीर चक्र ज्यांना मिळाले, त्या मेजर सोमनाथ शर्मा यांचे ते धाकटे बंधू होत. सोमनाथ शर्मा यांचा लढवय्या वारसा आणि असीम त्यागाची भावना जनरल शर्मा यांनी अखेरपर्यंत जपली, असे लष्कराने म्हटले आहे. विश्वनाथ शर्मा यांनी नैनितालच्या शेरवूड महाविद्यालय आणि डेहराडूनच्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय’ येथून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ४ जून १९५० रोजी ते १६व्या लाइट घोडदळात रुजू झाले.
शर्मा यांना १९६५च्या युद्धानंतर ब्रिगेडियर पदावर बढती मिळाली. त्यांनी ‘माउंटन ब्रिगेड’चे नेतृत्व केले. अंतर्गत बंडखोरी हाताळली. लष्करामध्ये उत्कृष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या ‘अति विशिष्ट सेवा पदका’ने त्यांचा १९७७ मध्ये सन्मान करण्यात आला. राजस्थानमध्ये त्यांनी चिलखती ब्रिगेडचेही नेतृत्व केले. नंतर, १९८० मध्ये त्यांनी पश्चिम विभागात ‘माउंटन डिव्हिजन’चे नेतृत्व केले. १९८४मध्ये त्यांनी पश्चिम विभागात कोअरचे प्रमुखपद सांभाळले. त्या वर्षी त्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘परम विशिष्ट सेवा पदका’ने (पीव्हीएसएम) गौरव करण्यात आला.
