Sheikh Hasina : बांगलादेशमधील मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर देशाच्या दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा आल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या या निर्णयामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या उठावानंतर शेख हसीना यांची तब्बल अनेक वर्षांची राजवट उलथवून टाकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील संघटना आणि नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल सिटीझन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ढाकामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि नाकेबंदी केली होती. त्यानंतर अखेर बांगलादेशातील अंतरिम सरकारने हा निर्णय घेत शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वृत्तानुसार, यासंदर्भात अधिकृत अधिसूचना कामकाजाच्या दिवशी जारी करण्यात येणार असल्याची माहिती अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात (आयसीटी) अवामी लीगचा खटला पूर्ण होईपर्यंत हा पक्ष बंदीचा निर्णय लागू राहणार असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे.

तसेच शनिवारी अंतरिम सरकारच्या मंत्रिमंडळाने आयसीटी कायद्यात सुधारणा केल्यानंतर आता केवळ व्यक्तींवरच नाही तर राजकीय पक्ष आणि संलग्न संघटनांवरही खटले चालवण्याचा अधिकार न्यायाधिकरणाला देण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. अंतरिम सरकारने याबाबत सांगितलं की, तक्रारदार आणि न्यायाधिकरणातील साक्षीदार तसेच जुलै २०२४ मध्ये हसीना यांना पदावरून हटवणाऱ्या समर्थकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेशसोडून दुसऱ्या देशात पलायन करावं लागलं होतं. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं होतं. तेव्हापासून हसीना आणि अवामी लीगच्या डझनभर नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.